दैनिक स्थैर्य । दि.१८ जानेवारी २०२२ । मुंबई । राज्याला विविध कलांची मोठी परंपरा लाभलेली आहे. चित्रकला, शिल्पकला आणि छायाचित्रकला अशा सर्व कलांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. या कलापरंपरेचा देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये गौरव झालेला आहे, असे गौरवोद्गार मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
फोर्ट भागातील जहांगिर कलादालनात दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचा सदस्यांनी टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी भाषामंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार नृपेन माधवाणी, फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सुनील व्यास, राजेंद्र वाघमारे, सहसचिव शशांक नरसाळे, पुरस्कार विजेते, छायाचित्रकार आणि कला रसिक उपस्थित होते.
कलाकारांना कलाकृतीचे प्रदर्शन करण्यासाठी जहांगिर कलादालनाने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या कलादालनात कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी निवड झालेल्या कलाकारांचे अभिनंदन करुन मराठी भाषा मंत्री श्री.देसाई म्हणाले, प्रदर्शनातील छायाचित्र ही स्तब्ध करणारी आहेत. ही छायाचित्रे टिपण्याऱ्या छायाचित्रकारांचा दृष्टिकोन नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्कृष्ट कला एकाच ठिकाणी पाहायला मिळते याचाही आनंद आहे. कलेची परंपरा आणि साधना पुढेही सुरु ठेवावी, असेही श्री.देसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगिर कलादालनात झाले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शक्य नसले तरी छायाचित्रकार म्हणून ही छायाचित्रे पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असता, असे श्री.देसाई यांनी सांगितले.
यावेळी श्री. देसाई यांनी छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी करतांना छायाचित्रांच्या वैशिष्ट्यांची माहितीही घेतली.
या छायाचित्र प्रदर्शन कार्यक्रमात श्री. देसाई यांच्या हस्ते दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाच्या 2019 ते 2021 या वर्षातील विजेते मिलिंद जोशी, अमोद कुमार, राजेंद्र वाघमारे, महेश आम्ब्रे, शेखर मानगावंकर, आशिष परब यांना छायाचित्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच भास्कर आठवले यांना लॅंडस्केप ट्रॅाफी तर गणेश उत्सवातील छायाचित्रांसाठी प्रोत्साहन बक्षीस श्रीमती सायली यांना देण्यात आला.
फोर्ट येथील जहांगिर कलादालनात सुरू असलेले छायाचित्र प्रदर्शन दि. 24 जानेवारी 2022 पर्यंत सर्व कलारसिकांसाठी खुले आहे.