दैनिक स्थैर्य । दि. 09 फेब्रुवारी 2022 । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । फलटण नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निडणूकीची घोषणा आगामी काळात होणार असून त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची ‘चमकोगिरी’ सुरु झाल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूकीसाठी गल्लोगल्ली ‘भावी मेंबर’ गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज असून आपणच ‘फिक्स नगरसेवक’ असल्याच्या आविर्भावात शहरात अशा इच्छुकांचा वावर सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.
पालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपून सध्या मुख्याधिकारी प्रशासकाची भूमिका बजावत आहेत. निवडणूकीची घोषणा प्रभाग रचनेत अडकली असल्याने प्रभाग रचना जाहीर होताच निवडणूकीचा कार्यक्रमही लवकरच घोषित होणार आहे. त्यामुळे आपली दावेदारी नागरिकांच्या नजरेत उतरवण्यासाठी गल्लोगल्ली कोणत्याही कार्यक्रमाला एक नाही तर किमान डझनभर ‘भावी मेंबर’ उपस्थिती लावत आहेत. एखाद्या ठिकाणी कुठली डागडुजी, दुरुस्ती, नूतनीकरण चालू असल्यास तिथेही हे ‘भावी’ उभे राहून काम करुन घेताना दिसत आहेत. सत्ताधारी राजे गट असो वा विरोधी खासदार गट असो दोन्हीकडे सारखीच गत असून प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच गल्ली-गल्लीतील मतांची आकडेमोड वेगात सुरु आहे.
संभाव्य प्रभाग रचनेच्या चर्चेमुळे ‘फिक्स नगरसेवक’ हे स्वत:च्या प्रभागामध्ये फिरत आहेतच त्यासोबतच शेजारील प्रभागामध्येसुद्धा दैनंदिन उपस्थिती लावून बेरजेच्या राजकारणाचे प्रयत्न करत आहेत.