स्थैर्य, कऱ्हाड, दि.३: खोटी जात सांगून लग्न करून तालुक्यातील एका महाविद्यालयीन युवतीची फसवणूक केल्याची घटना आज उघडकीस आली. त्या विवाहाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीला मानसिक त्रास दिल्याचाही प्रकार झाला आहे. त्याबाबत एका युवकासह त्याच्या आई, वडिलांवर कऱ्हाड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी सांगितले, की संबंधित युवतीची एका युवकाशी ओळख झाली. त्याने वेळोवेळी आपली मूळ जात लपवून त्या युवतीशी मैत्री केली. त्याने मराठा समाजातील आहे, असे सांगून आई, वडील चिपळूणला असतात, असेही त्या युवतीस सांगितले. रत्नागिरीत मोठे घर आहे. त्याशिवाय त्या युवकाला पुण्याच्या एका कंपनीत मोठ्या पगाराचा जॉबही आहे, असे त्या युवतीस सांगितले. त्या मुलाच्या आई- वडिलांनीही संबंधित युवतीला तेच सांगितल्याने तिचीही खात्री पटली.
काही कालावधीनंतर संबंधित युवतीशी त्याने मंगल कार्यालयात पाच मित्रांसमोर विधिवत लग्न केले. त्या वेळी युवकाने आमच्या घरी अडचण असल्याचे सांगितले होते. युवतीला लग्न केल्याचे फक्त फोटो काढूया, तसे न केल्यास जीव देण्याची धमकी दिल्याने युवती घाबरली. त्यानंतर हार घातलेल्या अवस्थेत त्यांनी फोटो काढले. युवतीला तू घरी काही सांगितलेस तर मी गावात सर्वांना फोटो दाखविणार आणि लग्न झाल्याचे सांगणार, तुझी बदनामी करणार, अशी धमकी त्याने दिली.
सुटीतही युवतीला कोणाला काही बोलू नकोस, असा मॅसेज त्याने केला. युवतीने फोटो डिलिट करण्यास सांगितले. मात्र, त्याने त्यास नकार दिला. त्यानंतर त्या युवकाने अशाच प्रकारे मानसिक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून संबंधित युवतीने घरात हा प्रकार सांगितला. माहिती घेतली असता हा युवक मराठा समाजातील नसून अन्य समाजातील आहे, असे समोर आले. त्या वेळी युवकासह त्याच्या आईवडिलांनी फसवणूक केल्याचे युवतीच्या लक्षात आले. प्रकार मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयिताने संबंधित युवतीला न्यायालयामार्फत नोटीस पाठविली. त्यानंतर संबंधित युवतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. फौजदार उदय दळवी तपास करत आहेत.