फाशीचा वड स्मारक नवीन पिढीसाठी प्रेरणादायी

मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले; फाशीचा वड येथे 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हौतात्म्य स्वीकारलेल्या 17 नरवीरांना अभिवादन


स्थैर्य, सातारा, दि. 9 सप्टेंबर : स्वराज्याची चौथी राजधानी सातारचा वैभवशाली इतिहास आहे. राज निष्ठेने प्रेरित होऊन रंगो बापूजी गुप्ते आणि सहकारी मंडळींनी दिलेला स्वातंत्र्यलढा प्रेरणादायी आहे. फाशीचा वड ऐतिहासिक स्मारक नवीन पिढीला माहिती होण्यासाठी भव्य विस्तारित स्मारक राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. सातारा नगरपरिषद व राष्ट्रसंवर्धन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने फाशीचा वड येथे 168 व्या स्मृतीदिनी 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हौतात्म्य स्वीकारलेल्या 17 नरवीरांना सोमवारी (दि. 8) अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, रंगो बापूजी गुप्ते यांच्या पाचव्या पिढीतील नात श्रीमती आरती गडकरी पुणे यांच्यासह विविध मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

कार्यक्रमास राष्ट्र संवर्धन संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव लेले, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगरपालिकेचे श्री. शिंद्रे, शहर संघचालक अ‍ॅड. नितीन शिंगटे, समरसता गतीविधी, प्रांत सहसंयोजक मुकुंदराव आफळे, जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, समरसता जिल्हा संयोजक जयंत देशपांडे, न्यू इंग्लिश स्कूल साताराचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, माजी नगरसेवक अविनाश कदम, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे कौन्सिल मेंबर अनंतराव जोशी, शहर कार्यवाह रविराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, फाशीचा वड ऐतिहासिक स्मारकाच्या विस्तारीत कामासाठी सर्व प्रकारची प्रशासकीय मदत केली जाईल.

इतिहास अभ्यासक मोहनराव शेटे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अटक ते कटक पर्यंत झाला. काळाच्या ओघात ब्रिटिश सरकारने अन्यायाने सातारची गादी खालसा केली. रंगो बापुजी गुप्ते यांनी लंडनमध्ये जाऊन सनदशीर मार्गाने 14 वर्ष लढा दिला. पण त्याला यश आले नाही. हिंदुस्थानात परत येऊन त्यांनी बहुजनांना संघटित केले व 1857 च्या सशस्त्र लढ्यात आपले योगदान दिले. स्वातंत्र्य लढ्यासाठी बहुजन, सर्व जाती जमाती मधील वीरांनी संघटित लढा दिला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ही विलक्षण घटना आहे असे त्यांनी सांगितले.

गेली 60 वर्ष अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करणारे प्रकाशराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यवाह अशोक रेमझे यांनी केले. अभिवादन कार्यक्रमासाठी हिंदू पब्लिक स्कूल, शाहूपुरी माध्यमिक शाळा, शाहुपुरी येथील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. वंदे मातरम होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!