स्थैर्य, सातारा, दि. 15 : सातारा शहरात 17 जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सातारा शहराच्या बाजारपेठेत नागरिकांची किरणा व भाजीमार्केटमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी ट्रॅफिकही जॅम झाले. दहा दिवस कडक निर्बंध असल्याच्या धास्तीमुळे लोक खरेदी साठी करू लागल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.
सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे शेवटी जिल्हा प्रशासनाला अखेर दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करावा लागला आहे. लॉकडाऊनचे निर्बंध दि. 17 ते 22 पर्यंत कडक असणार आहेत. या कालावधीत सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने संपुर्णत: बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दि. 22 पासून 26 जुलैपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांचीच दुकाने सुरु करता येणार आहेत. त्यामुळे अत्यावश्ये सेवा मिळणार असल्या तरी इतर सर्व दुकाने व आस्थापना मात्र बंद राहणार आहेत. यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती.
सातारा शहरातील मोती चौक, पोवई नाका, खालचा रस्ता, राधिका रोड आदी सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्यामुळे ट्रॅफिक जॅम झाले होते. वाहतुकीची कोंडी करताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. तसेच जुना मोटर स्टँड येथील मार्केट बंद आहे. मात्र, मार्केटच्या बाहेर रस्त्यावर मंडई फुलून गेली होती. आता आदल्या दिवशी म्हणजे 16 जुलैलाही मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.