स्थैर्य, सातारा, दि. 2 : 31 मे रोजी चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाने मोठी सूट दिल्यामुळे सातार्यात नागरिकांची खरेदीसाठी मोठी झुंबड पहायला मिळत आहे. खरेदी करत असताना नागरिक खबरदारी घेत नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. दरम्यान, शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्यामुळे सातार्यातून कोरोना केव्हा हद्दपार होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्यामुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. किराणा, भाजी, मेडिकल, रुग्णालय, पेट्रोल पंप या अत्यावश्यक बाबी ठराविक वेळेत ठेवून सर्व प्रकारची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले तर व्यापार्यांना फार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. 31 मे रोजी अखेरचा लॉकडाऊन संपल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाने मोठी सूट देण्यास सुरुवात केली. हॉटेल्स आणि मॉल्स वगळता सर्व प्रकारची दुकाने ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे 1 जूनपासून सातार्यात खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याचे दिसून येत आहे. जवळपास तीन महिन्यांनी दुकाने सुरू झाल्यामुळे सर्व दुकानांमध्ये गर्दी होत आहे.
गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये विवाहाचे मुहूर्त होते. मात्र अशा समारंभांवर बंदी घातल्यामुळे वर आणि वधू या दोन्ही पक्षाकडील मंडळी हिरमसून गेली होती. आता चित्र बदलत असल्याचे स्पष्ट होऊ लागल्यानंतर विवाह समारंभाच्या पार्श्वभूमीवर कपडे, भांडी खरेदीसाठी गर्दी होत आहे. ग्रामीण भागातून खरेदीसाठी सातारा शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असल्यामुळे बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली असल्याचे दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी सातारा शहराला आणि उपनगरांना वळीव पावसाने झोडपून काढले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॉन्सून 6 जूनच्या आसपास हजेरी लावणार असल्यामुळे शेतकर्यांनी बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी गर्दी केली. होती. राजवाडा परिसर, मोती चौक, खणआळी, राजपथ, पोवईनाका, बसस्थानक परिसर, विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटा या परिसरातही असेच चित्र दिसून येत होते. मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर छत्र्या दुरुस्ती व नवीन छत्र्या खरेदी करण्यासाठीही या दुकानांमध्ये मंगळवारी नागरिकांनी गर्दी केली होती.
थोडक्यात सोमवारपासून शहरांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडत असल्यामुळे शहरातील रस्ते गजबजून गेले आहेत. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असल्यामुळे सातारा पूर्वपदावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी खरेदी करताना नागरिक खबरदारी घेत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे सोशल डिस्टन्िंसगचा पुरता फज्जा उडाला असल्याचे स्पष्ट होत आहे.