स्थैर्य, फलटण, दि. २९ : फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना बाधीतांना योग्य उपचाराबरोबर अन्य सुविधा, उत्तम नैसर्गिक वातावरण लाभत असल्याने रुग्णांची प्रकृती सुधारण्याचे प्रमाण अधिक आहे. एकूणच येथील कोरोना केअर सेंटरचे कामकाज कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले.
फलटण तालुक्यातील तरडगाव, हिंगणगाव, साखरवाडी, विडणी, निंबळक, साठे फाटा, गोखळी तसेच शहरातील कोरोना केअर सेंटरला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट दिली. यावेळी आ. दीपकराव चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या कोरोना केअर सेंटरमधील कोरोना बाधीत व्यक्तींशी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांना औषधोपचार व अन्य सुविधा वेळेवर मिळतात काय ?, त्यांच्या काही अडचणी आहेत का ? प्रशासन सहकार्य करीत आहे का ? याची विचारपूस केली. कोरोना केअर सेंटर मध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी बाबत विचारणा केली, आशा वर्कर यांना जादा वेतनाचा लाभ मिळतो काय याबाबत विचारणा करतानाच ग्रामीण भागात कोरोना सर्वेक्षण करताना ग्रामस्थ व बाधीत रुग्णांच्या कुटुंबाचे अपेक्षीत सहकार्य लाभते काय याबाबतही त्यांनी माहिती घेतली.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या कोरोना केअर सेंटरचे कामकाज उत्कृष्ट असून कोरोना बाधीतांवर उपचार करण्यासाठी ग्रामीण भागातील कोरोना बाधीतांना गृह विलगीकरणामध्ये न ठेवता कोरोना केअर सेंटरमध्येच दाखल करावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधीतांना दिले आहेत.