
स्थैर्य, गिरवी, दि. 17 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य लढा हा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून, सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्यसैनिकांचा गौरवशाली वारसा लाभला आहे, असे प्रतिपादन जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सचिव आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती शारदादेवी कदम यांनी केले. गिरवी (ता. फलटण) येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शारदादेवी कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी एनसीसी कॅडेट्सच्या पथकाने तिरंग्याला सलामी दिली. विद्यार्थ्यांनी यावेळी पंचरंगी सामुदायिक कवायत आणि मैदानी कसरतींचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला गिरवीच्या सरपंच सौ. वैशाली कदम, उपसरपंच संतोष मदने, सेवा सोसायटीचे चेअरमन कुंडलीक निकाळजे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजयकुमार सावंत यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक दत्तात्रय सुतार यांनी मानले.

