स्थैर्य, सातारा, दि.१६: मीच माझ्या सातारकरांचा रक्षक या सामाजिक संस्थेच्या सवय भानं उपक्रमाच्या चौथ्या टप्प्याची सुरवात मोती चौक सातारा येथून करण्यात आली . सातारकरांना कोविड संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक उपायांची माहिती देणाऱ्या जनप्रबोधन मोहिमेची सुरवात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून करण्यात आली .
मार्च २०२० पासून सातारा जिल्ह्यात करोनाचे संक्रमणं सुरू झाले . जिल्ह्यात करोना बाधित आणि त्यामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . साताऱ्यात आरोग्य व्यवस्थेला मदत व सातारकरांचे प्रबोधन करणे याकरिता व्यापार व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मीच माझ्या सातारकरांचा रक्षक या सामाजिक संघटनेची स्थापना केली . या संघटनेने पहिल्या टप्प्यात साताऱ्यातील दीड लाख नागरिकांची ऑक्सीजन व तापमान पातळी तपासली .करोना संदर्भातील जागृती करणाऱ्या पत्रकांचे वाटप करून या संसर्गाची भीती कमी करणे, आर्सेनिक अल्बम या प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळयांचे वाटप, शहराच्या विविध भागात औषध फवारणी आणि त्यानंतरच्या टप्प्यात सवय भानं उपक्रमा अंर्तगत एकवीस सत्रांमध्ये तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन तसेच रुग्णांना तत्काळ ऑक्सीजन उपलब्ध करून देण्यासाठी पोर्टेबल ऑक्सीजन मशीनची उपलब्धता व त्याचे घरोघरी वितरण इं उपक्रम राबवण्यात आले .
शासनाने कोविड च्या उपाययोजना सूचित केल्या त्याचे सातारकरांकडून पालनं होत नसल्याचे आढळून आले . गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे, या जनप्रबोधनासाठी संघटनेच्या वतीने स्कूल बसच्या वाहनातून ध्वनीक्षेपक लावून चौथ्या टप्प्याची मोहिम बुधवार पासून मौती चौकातून सुरू झाली . पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी या उपक्रमाची सुरवात केली . पोलीस प्रशासन सुध्दा सवयभान उपक्रमाला सहकार्य करेल अशी ग्वाही दिली . संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, वसंतशेठ जोशी , जयेंद्र चव्हाणं, सचिव मनोज देशमुख, शेखर घोडके, श्रेणिक शहा, यशवंत गायकवाड, सागर लुणावत, महेश लोया उपस्थित होते .