दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । मुंबई । मुंबई- गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे. महामार्गावरील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करुन जनतेला तातडीने दिलासा द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात आज मंत्री श्री. चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र. 1, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा क्र.2, आदी रस्त्यांची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणाचे कामाचा आढावा घेतला. ही सर्व कामे तंत्रज्ञानाचा वापर करुन जलदगतीने पूर्ण करावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात मंत्री श्री.चव्हाण यांनी सूचना दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.
परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. तो तत्काळ संबंधितांना वितरित करण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.