सापडलेले मोबाईल अखेर कामगारांना परत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२३ | बारामती |
बारामती एमआयडीसी येथील उद्योजक इरफान इनामदार व त्यांचे मित्र भाऊसाहेब उदमले यांना रेल्वे लाईन लगत चार मोबाईल सापडले होते. ओळख पटवून त्यांनी ते चार मोबाईल कामगारांना परत दिले. कामगारांना किमतीचे मोबाईल परत मिळाल्याने त्यांचा आनंद बघण्यासारखा होता. या कार्यामुळे इरफान इनामदार व त्यांचे मित्र उदमले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

रेल्वे लाईनलगत सकाळी चालण्याचा व्यायाम करीत असताना मोबाईलमधील अलार्म वाजला; परंतु चुकून कोणाचा तरी पडला असेल म्हणून दुर्लक्ष करून इनामदार व उदमले पुढे गेले. परत येत असताना त्याच जागेवर वारंवार अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आल्यावर पिशवीत विविध कंपन्यांचे, विविध मॉडेल्सचे चार मोबाईल होते. त्यामध्ये सीमकार्ड नव्हते. म्हणून बारामती एमआयडीसीमधील उद्योजक यांच्या ‘व्हाट्सअ‍ॅप ग्रुप’वर सदर मोबाईल सापडल्याचे फोटो टाकले.

‘व्हाट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून चौधरी मॉल येथे काम करणारे सुरेंद्र मामबोलिया, धर्मेंद्र पिप्लोडिया, सुनील बामनिया, मोहन सिंग या चार कामगारांनी संपर्क साधून, मोबाईल लॉक कोड व मोबाईलमधील फोटो व इतर ओळख सांगितली व सदर मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले होते. चोरट्यांना मोबाईल लॉक न उघडल्याने फक्त सीमकार्ड काढून मोबाईल फेकून दिले असावेत, असे कामगारांनी सांगितले.

आर्थिकदृष्टीने गरीब असलेल्या कामगारांचे मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी इरफान इमानदार व भाऊसाहेब उदमले यांना धन्यवाद दिले. उद्योजक व त्यांच्या मित्राच्या चाणाक्षपणामुळे त्वरित मूळ मालकास मोबाईल मिळाले, याबद्दल दोघांचे परिसरात कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!