स्थैर्य, सातारा, दि. 25 : किल्ले अजिंक्यताराच्या पुढे तसेच खिंडवाडीकडे जाणाऱ्या डोंगराला रविवारी दुपारी वणवा लागला. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या दोन युवकांनी आपली वाहने थांबवून हा वणवा आटोक्यात आणला. विशेष म्हणजे हे दोन्ही युवक एकमेकांना ओळखत नव्हते. वणवा आटोक्यात आणतानाच दोघांची ओळख झाली. त्यांनी हि माहिती वनविभागाशी संपर्क साधून कळवली.
कोरोनाच्या भीतीने सध्या कोणी घराबाहेर पडत नाही. मात्र काही उचापती लोक बाहेर पडून अशा उचापती करतात. अशीच कोणी तरी अज्ञात व्यक्तीने खिंडवाडी नजीकच्या डोंगराला वणवा लावला. वणवा लागल्याचे दृश्य गाडीवरून निघालेल्या या दोन युवकांना दिसले. त्यांनी आपली गाडी थांबवून तो वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि वनविभागास त्यांनी या वणव्याची माहिती देत कोण मदतीला येते का याची प्रतीक्षा न करता त्या दोघांनी वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या दोघांमधील एक तारळे येथील छायाचित्रकार प्रशांत भांदिर्गे तर दुसरे उंब्रज येथील अमोल पवार. यावेळी या दोघांना वणवा आटोक्यात आणल्याचे समाधान वाटत आहे.