लोककलावंत छगनराव चौगुले यांची लोकगीतं हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा – उपमुख्यमंत्री अजित पवार


स्थैर्य, मुंबई, दि. 21 : लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील लोकगीतं, लोककला, लोकसंस्कृतीच्या प्रचार, प्रसारासाठी छगनरावांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. छगनरावांनी सांगितलेल्या देवदेवतांच्या कथा, गायलेली कुलदेवतांची गाणी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

लोककलावंत छगनराव चौगुले यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले, छगनरावांची गाणी ही महाराष्ट्रात विशेषत: ग्रामीण भागात कायम प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. बारामती, पुण्यासह राज्यात सर्वत्र त्यांचा स्वत:चा रसिकवर्ग आहे. ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ या गाण्यानं त्यांना नवी ओळख दिली असली तरी ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ सारख्या गीतसंग्रहांमुळे ते आधीपासूनच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या माध्यमातून त्यांनी लोककलांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी घडवले. जागरण गोंधळासारखी लोककला विद्यार्थ्यांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत यशस्वीपणपे पोहोचवली. छगनराव चौगुले यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या लोककला जगताची, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!