दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सांगली । खरसुंडी वितरिकेची सुरुवात होणाऱ्या विमोचक (हेड रेगवॉटर) वितरण हाऊद, डिलिवरी चेंबर, व्हॉल्व केबिन येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन कामाची माहिती घेतली. तसेच टेंभू प्रकल्पामध्ये प्रथमच वापर होणाऱ्या इन्सेग्रेशन टाईप, अल्ट्रा सोनिक टाईप, फ्लो मिटर, फ्लोट्रोमॅग्नेटीक टाईप फ्लो मिटरची माहिती घेतली. तसेच या प्रकल्पात फ्लो-मिटर हे जीपीआरएस बेस्ड बसविण्यात येणार असून याद्वारे आवर्तण कालावधीमधील विसर्गाचा ऑनलाईन डाटा उपलब्ध होणार असल्याने त्यामुळे चांगल्या प्रकारे पाण्याचे वितरण करता येणे शक्य असल्याचे यावेळी सांगितले. तसेच टेंभू उपसा सिंचन योजनेला भेट देऊन सध्यस्थितीत सुरु असलेल्या कामाची केली पाहणी, उपसा सिंचन योजनेच्या कामांबाबत तसेच अंमलबजावणीबाबत केल्या सूचना.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडी वितरिका व बंदिस्त नलिका प्रकारच्या कामास भेट दिली. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंत मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता ए. व्ही. हरुगडे, सहायक अभियंता प्रमोद व्होनमाने, शिवाजी पाटील, कंत्राटदार में इंडियन ह्युम पाईप्स व शेळके कंट्र्कशन्सचे श्री महाजन, श्री मुजावर व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आटपाडी तालुक्यातील शेतीच्या पाण्याचे प्रश्न निकाली काढण्यासाठी खरसुंडी वितरिका ही महत्वपुर्ण भूमिका बजावणार आहे. या वितरिकेमुळे 18 गावे ओलिताखाली येतील. यामध्ये आटपाडी, खरसुंडी, बनपुरी, बाळेवाडी, मिटकी, तळवडे, शेटफळे, लेंगरेवाडी, माडगुळे, मासाळवाडी, माळेवाडी, करगणी, धावडवाडी, कानकात्रेवाडी, गोमेवाडी, भिंगेवाडी, यमाजी पाटील वाडी, खांजोडवाडी या अठरा गावांचा समावेश आहे. असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, खरसुंडी वितरिकेच्या कामासाठी 53.88 कोटी निधी देण्यात येणार असून कामांमध्ये 1700 ते 200 व्यासाच्या व 81.34 किमी लांबीच्या कामांमध्ये प्रिस्टेड काँक्रीट पाईप्स (पीएससी) प्रिस्टेड काँक्रीट सिलेंडर पाईप्स (पीसीसीपी) बार व्रॉपेड स्टील सिलेंडर पाईप्स (बीडब्लुएससी) व एचडीपीई पाईपचा वापर करण्यात येणार आहे.
टेंभू उपसा सिंचन योजना महाराष्ट्रातील मोठी उपसा सिंचन योजना असून या योजनेची सुरुवात कराड तालुक्यातील टेंभू बराज कृष्णा नदीवरुन होते. टेंभू उपसा सिंचन योजनेचे लाभ क्षेत्र 80 हजार 472 हेक्टर असून यामध्ये सातारा व सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यातील 240 गावांचा समावेश आहे. या योजनेकरिता 22 टीएमसी पाणी वापर नियोजित असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, टेंभू उपसा सिंचन योजनेतील खरसुंडी वितरिका सर्वात मोठी वितरिका आहे. कृष्णा नदीपासून खरसुंडी वितरिकेचे अंतर 80 किलो मिटर तर उंची 154 मिटर इतकी आहे. टेंभू प्रकल्पातील टप्पा – 3 अ (माहुली) पासून पुढे घाणंद तलावापासून सुरु होणाऱ्या घाणंद हितवड कालव्याचे 9 किलोमिटर पासुन या वितरिकेची सुरुवात होते. खरसुंडी वितरिकेचे सिंचन क्षेत्र 6 हजार 884 हेक्टर असून सुरुवातीचा विसर्ग 3.58 घनमिटर इतका आहे. त्यामुळे ही वितरिका आटपाडी तालुक्यासाठी महत्वपुर्ण वितरिका आहे. यामधून मिळणाऱ्या पाण्यापासून दुष्काळी क्षेत्र ओलिताखाली येईल.