स्थैर्य , नवी दिल्ली, दि .२५: प्रजासत्ताकदिनी प्रथमच दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड होईल. अखेर दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी दिली. नव्या कृषी कायद्यांविरुद्ध परेडसाठी देशभरातून शेतकरी पोहोचत आहेत. ही परेड शांततेत काढली जाईल, असा संघटनांचा दावा आहे. राजकीय पक्षांनी यापासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त दीपेंद्र पाठक म्हणाले, संयुक्त किसान मोर्चास सिंघू आणि टिकरीपासून सुमारे ६४ किमी आणि गाझीपूर बॉर्डरपासून ४६ किमी परेडची परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तानातून ऑपरेट होणारे ३०८ सोशल मीडिया अकाउंट ट्रेस करण्यात आले असून परेडदरम्यान गोेंधळ माजवण्याचा हा कट आहे. दरम्यान, निदर्शनासाठी ३६५ दिवस पडलेत. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी २६ जानेवारीचा दिवस निवडणे योग्य नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा तब्बल १८० किमी मोर्चा, २१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची मुंबईत आझाद मैदानात एकजूट
नव्या कृषी कायद्यांना होणाऱ्या विरोधामुळे आता महाराष्ट्र तापला आहे. ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी १८० किमी मोर्चा काढत नाशिकहून मुंबईत दाखल झाले. दिल्लीत निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून २१ जिल्ह्यांतून हजारो शेतकरी मुंबई येथील ऐतिहासिक आझाद मैदानावर एकत्र येतील. यात शरद पवारही सहभागी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचा दावा : परेडमध्ये २ लाख शेतकरी असतील
– शेतकरी संघटनांनी दावा केला आहे की, दिल्लीत ट्रॅक्टर परेडमध्ये सुमारे २ लाख शेतकरी असतील.
– पंजाब, हरियाणा, राजस्थान, उप्रसह इतर राज्यांतून शेतकरी दिल्लीत दाखल होत आहेत.
– सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे.
– योगेंद्र यादव यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, फक्त ट्रॅक्टर आणा, ट्रॉली नको.
– पंजाबच्या अनेक शहरांतून परेडची रंगीत तालीम होत आहे. अनेक शेतकरी दिल्लीला रवाना झाले.
– राकेश टिकेत म्हणाले, उत्तराखंड, उप्रमधून २५ हजार शेतकरी येतील.
३ राज्यांच्या पोलिसांचा असेल बंदोबस्त, ट्रॅक्टरवर असतील देखावे, उप्रत गाझीपूरमध्ये ट्रॅक्टर्सना डिझेल मिळणार नाही
– दिल्ली, उप्र, हरियाणा पोलिसांचा शेतकऱ्यांच्या परेडमध्ये बंदोबस्त.
– २५०० शेतकरी स्वयंसेवक वाहतूक व्यवस्था सांभाळतील.
– वैद्यकीय मदतीसाठी परेडमध्ये ४० रुग्णवाहिका शेतकरी चालवतील.
– एका ट्रॅक्टरवर फक्त पाच लोकांनाच बसण्याची असेल परवानगी.
– परेडमध्ये ट्रॅक्टरवर देखावे असतील, प्रत्येक ट्रॅक्टरवर असेल तिरंगा.
– उप्रत गाझीपूरमध्ये पंपांनी डिझेल देऊ नये, अशा पोलिसांच्या सूचना.
शेतकरी : परेड शांततेत असेल, राजकीय पक्षांनी आमच्या मोर्चापासून दूरच राहावे
दिल्ली पोलिस : परेडमध्ये बाधा यावी म्हणून पाकिस्तानातून चालताहेत ३०८ ट्विटर हँडल