टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोषात ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. 27 जून 2025 | फलटण | टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष सुरु असतानाच माऊलींचा व स्वाराचा असे दोन्ही अश्‍व एकामागून एक दौडले आणि माऊली….माऊली नामाचा जयघोष सुरु झाला. अशा भक्तीपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडले. त्यानंतर सायंकाळी सोहळा तरडगांव मुक्कामी विसावला.

लोणंद – फलटण मार्गावर दुपारी २.३० वाजता सरदेचा ओढा, कापडगांव येथे फलटण तालुक्याच्या सीमेवर सोहळ्याचे फलटण तालुका वासियांनी स्वागत केले. त्यामध्ये आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, फलटण बाजार समितीचे संचालक प्रवीण खताळ यांच्यासह फलटण व खंडाळा तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

उभ्या रिंगणासाठी दुपारी अश्‍व चांदोबाचा लिंब येथे दाखल झाले. राजाभाऊ चोपदार यांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी सव्वा चार वाजता रिंगणासाठी अश्‍व सोडण्यात आले. अश्‍व रथा पुढील २७ दिंड्या पार करुन रथाच्या दिशेने धावत गेले. समोर स्वाराचा अश्‍व तर मागे माऊलींचा अश्‍व दौडत होता. वारकर्‍यांच्या मुखी माऊली… माऊली नामाचा जयघोष आणि साथीला टाळ, मृदुंगाचा गजर सुरु होता. अशा वातावरणातच स्वाराचा व माऊलींचा अश्‍व रथा मागे २० दिंड्यांपर्यंत जावून पुन्हा माऊलींच्या रथाकडे निघाले. वारकर्‍यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत दोन्ही अश्‍व माऊलींना प्रदक्षणा घालुन व नारळ प्रसाद घेवून गर्दीतून वाट काढीत सोहळ्याच्या अग्रभागी पोहोचले. रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी सोहळा तरडगांवकडे मार्गस्थ झाला.

रिंगण सोहळा पाहण्यासाठी आणि माऊलींचे दर्शन घेण्यासाठी लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, परहर खुर्द, हिंगणगांव, रावडी, माळेवाडी, शिंदेमाळ आदी गांवातील हजारो भाविक उपस्थित होते. लोणंद ते तरडगांव या वाटचालीत विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व भाविकांनी माऊलींसह सोहळ्याचे स्वागत करुन दर्शन घेतले.


Back to top button
Don`t copy text!