दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२३ । तरडगाव । टाळ, मृदुंगाचा गजर व हरीनामाचा जयघोष सुरु असतानाच माऊलींचा व स्वाराचा असे दोन्ही अश्व एकामागून एक दौडले आणि माऊली….माऊली नामाचा जयघोष सुरु झाला. अशा भक्तीपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडले. त्यानंतर सायंकाळी सोहळा तरडगांव मुक्कामी विसावला.
लोणंद – फलटण मार्गावर दुपारी २.३० वाजता सरदेचा ओढा, कापडगांव येथे फलटण तालुक्याच्या सीमेवर सोहळ्याचे फलटण तालुका वासियांनी स्वागत केले. त्यावेळी कापडगावच्या सरपंच सौ. कल्पना आप्पासाहेब खताळ यांनी माऊलींच्या स्वागतासाठी उपस्थित तालुक्यातील मान्यवरांचे यथोचित स्वागत केले. त्यामध्ये आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी तथा पालखी सोहळ्याचे नोडल अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, फलटणचे नूतन तहसीलदार अभिजित जाधव, महानंद डेअरीचे संचालक डी. के. पवार, जिल्हा परिषद माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, प्रा. भीमदेव बुरुंगले, छत्रपती शिवाजी वाचनालयाचे संचालक तुषार नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकारी सौ. मोहिनी चव्हाण, फलटण बाजार समितीचे संचालक प्रवीण खताळ, कापडगावचे उपसरपंच रामा केसकर, वैभव खताळ, पोलिस पाटील नंदकुमार खताळ पाटील, मनोज चव्हाण, चव्हाणवाडीचे उपसरपंच प्रशांत चव्हाण, अजित भोईटे, दशरथ खताळ, पराग भोईटे, संजय चव्हाण, आबासो शिंदे, सुनील शिंदे, सुनील गरुड, अशोक नाळे, विनोद भोईटे, राजेंद्र भोईटे, हेमंत कचरे, भाऊसाहेब कापसे यांच्यासह फलटण व खंडाळा तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
उभ्या रिंगणासाठी दुपारी ३.३० वाजता अश्व चांदोबाचा लिंब येथे दाखल झाले. बाळासाहेब चोपदार यांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी सव्वा चार वाजता रिंगणासाठी अश्व सोडण्यात आले. अश्व रथा पुढील २७ दिंड्या पार करुन रथाच्या दिशेने धावत गेले. समोर स्वाराचा अश्व तर मागे माऊलींचा अश्व दौडत होता. वारकर्यांच्या मुखी माऊली… माऊली नामाचा जयघोष आणि साथीला टाळ, मृदुंगाचा गजर सुरु होता. अशा वातावरणातच स्वाराचा व माऊलींचा अश्व रथा मागे २० दिंड्यांपर्यंत जावून पुन्हा माऊलींच्या रथाकडे निघाले. वारकर्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत दोन्ही अश्व माऊलींना प्रदक्षणा घालुन व नारळ प्रसाद घेवून गर्दीतून वाट काढीत सोहळ्याच्या अग्रभागी पोहोचले. रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी सोहळा तरडगांवकडे मार्गस्थ झाला.
रिंगण सोहळा पाहण्यासाठी आणि माऊलींचे दर्शन घेण्यासाठी लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, परहर खुर्द, हिंगणगांव, रावडी, माळेवाडी, शिंदेमाळ आदी गांवातील हजारो भाविक उपस्थित होते. लोणंद ते तरडगांव या वाटचालीत विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व भाविकांनी माऊलींसह सोहळ्याचे स्वागत करुन दर्शन घेतले.