दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । फलटण । राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प सातारा जिल्ह्यात कोळकी (ता. फलटण) येथे होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली. राज्य शासनाने या प्रकल्पास मान्यता दिली असून सातारा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
हा प्रकल्प कोळकी येथे होण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर कायम आग्रही व प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असल्याचे उदय कबुले म्हणाले. संपूर्ण स्वच्छता अभियान लोकांच्या सहभागातून राबवून सातारा जिल्ह्याने संपूर्ण देशात नावलौकिक मिळविला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व गावे निर्मल ग्राम केली. यामध्ये लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून शोचालय बांधकाम व त्याचा नियमित वापर केला जावा यासाठी काम केले. स्वच्छ भारत मिशन टप्पा २ सुरु झाल्यापासून संपूर्ण गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी घर तिथे शोचालय उपक्रम यशस्वीपणे राबविला. सर्व गावांमध्ये हागणदारीमुक्तीसाठी नव्याने उपक्रम राबवण्यात येत असून गावस्तरावरील सर्व कुटुंब, संस्था, शाळा, अंगणवाडीमध्ये शौचालय व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित ठेवण्यासाठी प्रयत्न
संपूर्ण देशात हागणदारी मुक्त अधिक गावे करण्याचे अभियान देशपातळीवरून राबवण्यात येत आहे. त्या धर्तीवर जिल्ह्यात कुटुंब स्तरापासून सार्वजनिक स्तरापर्यंत घनकचरा व सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम जोमाने सुरु केले आहे. स्वच्छता अभियानात जिल्हा कायम अग्रक्रमावर रहावा त्याचबरोबर जनतेमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती व्हावी यासाठी जिल्हा परिषद कायम विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देत आहे. कोळकी येथील मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प उभारणे व यशस्वीपणे कार्यान्वित ठेवणे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील गावांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत सातत्य राहण्यासाठी व दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचे समूळ उच्चाटन होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात असे दिशादर्शक प्रकल्प राबविले जातील. कोळकीचा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प सर्वांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास संजीवराजे नाईक – निंबाळकर यांनी व्यक्त केला.
दूषित पाण्याचे दुष्परिणाम थांबणार !
सातारा जिल्हा परिषदेने प्रायमू (पुणे) या संस्थेच्या सहकार्याने राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास कोळकी या गावाचा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प आराखडा सादर केला होता. त्यास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून या प्रकल्पासाठी ७५ लाख रूपये इतका निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पामध्ये कोळकी व आसपासच्या गावातील शौचालयांच्या शोषखड्ड्यातील मैला व सेप्टिक टँकमधील बाहेर पडणाऱ्या मैल्यावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पामधून उत्कृष्ट खत निर्मिती करून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच गावातील दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार नियंत्रणात येऊन लोकांचे आरोग्यमान सुधारण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प लोकसहभाग व शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने यशस्वीपणे राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.