सज्जनगडावर दिवाळीची पहिली पहाटे ऐतिहासिक कार्यक्रमांनी साजरी


स्थैर्य, सातारा, दि.20 ऑक्टोबर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,.. हर हर महादेव’.. अशा नशा जयघोषात पारंपारिक पोशाखात किल्ले सज्जनगडावर यावर्षीचा सहावा मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सज्जनगड बसस्थानक ते सज्जनगड नगर प्रदक्षिणा मार्गावर शेकडो मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी शिवभक्तांची मांदियाळी गडावर हजर झाली होती.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आपण दिवाळी पाडवा हे मराठी सण साजरे करत आहोत अशा गडकिल्ल्यांवर ही आपल्या मशाली प्रज्वलित राहिल्या पाहिजेत. आपले गड किल्ले संवर्धन व्हावेत ऐतिहासिक खेळ अशा गड किल्ल्यावर साजरी व्हावेत या उद्देशाने दुर्गनाद प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षापासून किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सव, ऐतिहासिक खेळ, शाहीर पोवाडे साजरे करत आहे.

आज पहाटे साडेतीन वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांना व धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांना अश्व मानवंदना देण्यात आली. चार वाजता वाहनतळ येथे श्री रामदास स्वामी संस्थान अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून हलगी शिंग तुतारीच्या निनादात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. साडेचार वाजता अंगलाई देवी मंदिराजवळ श्री समर्थसेवा मंडळाचे कार्यवाहक योगेशबुवा रामदासी यांच्या हस्ते पालखीचे विविधवत पूजन करण्यात आले. पावणे पाच वाजता पालखी मिरवणुक धाब्याच्या मारुती मंदिराजवळ पटांगणामध्ये आली होती. मावळा प्रतिष्ठानच्या यांच्या माध्यमातून ऐतिहासिक साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर श्री समर्थ रामदास स्वामी समर्थ समाधी मंदिरासमोरील अशोक वन येथे राष्ट्रीय शाहीर रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचा शिवकालीन ऐतिहासिक पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर ध्येयमंत्र व प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!