दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२३ | सातारा |
भारतासाठी आजचा दिवस अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरला आहे. आज भारताची ‘चंद्रयान ३’ मोहीम यशस्वी झाली आहे. भारताच्या ‘विक्रम लॅण्डर’चे आज सायंकाळी ६.०५ मिनिटाला चंद्रावर ‘सॉफ्ट लॅण्डिंग’ झाले आणि देशभरात जल्लोषास सुरूवात झाली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून हा क्षण ‘लाईव्ह’ अनुभवत होते. भारताचे ‘चांद्रयान ३’ चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर मोदींनी इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. यावेळी इस्त्रोचे सर्व शास्त्रज्ञ टाळ्यांच्या कडकडाटात एकमेकांना शुभेच्छा देत होते. आज देशातील १४० कोटी जनता धन्य झाल्याचे मोदींनी सांगितले. आज चंद्राच्या दक्षिण धु्रवावर उतरणारा जगातील पहिला देश ‘भारत’ बनला आहे. हा क्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. आजपर्यंत जगातील तीनच देशच चंद्रावर उतरले आहेत. आज चंद्रावर उतरणारा अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर भारत चौथा देश बनला आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी आज अभिमानाची बाब ठरली आहे. इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांची गेल्या अनेक वर्षांपासूनची कठोर मेहनत यामुळे आज आपण चंद्रावर उतरलो आहे, असे मोदींनी सांगितले. आजचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सर्व देशवासीय गेली कित्येक दिवस वाट पाहत होते.
यापूर्वी इस्त्रोकडून २०१९ साली ‘चंद्रयान २’ मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यामुळे पुन्हा इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनत करून ‘चंद्रयान ३’ मोहीम यशस्वी केली आहे. आज चंद्रयान ३ मोहीम यशस्वी करण्यासाठभ देशातील वेगवेगळ्या भागात पूजाअर्चा, होमहवन, महाअभिषेक करण्यात येत होते. शेकडो नागरिकांनी मंदिरात जाऊन देवापुढे ‘चंद्रयान ३’ मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. आज अखेर ही मोहीम यशस्वी झाल्याने देशवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.