स्थैर्य, कराड, दि. 14 : येथील शाहू चौकातील नारळ दुकान व मोबाईल शॉपीला लागलेल्या भीषण आगीत सुमारे 8 लाख 50 हजाराचे नुकसान झाले. सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी, शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शाहू चौकात धन्यकुमार अंबालाल शहा यांचे धन्यकुमार अँड ब्रदर्स हे नारळाचे दुकान आहे. या दुकानाच्या शेजारीच कल्पेश मोबाईल शॉपी आहे. सोमवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास धन्यकुमार अँड ब्रदर्स या नारळाच्या दुकानातून अचानक धूर येत असल्याचे रस्त्यावरून जाणार्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर शेजारीच्या काही लोकांनी दुकानाचे मालक शहा यांना फोन करून घटनेची माहिती दिली. काही वेळातच ते आपल्या दुकानात आले. दुकान उघडून पाहिले तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते तसेच शेजारील कल्पेश मोबाईल शॉपी या दुकानातही ही आग पसरली होती. त्याचवेळी अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. तोपर्यंत शहा यांच्या दुकानातील नारळाची पोती व इतर साहित्य व कल्पेश मोबाईल शॉपीमधील कॉम्पुटर, मोबाईल्स, मोबाईलचे पोर्ट, सीसीटीव्ही कॅमेरे आदी साहित्य व दुकानाचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. या आगीमुळे दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे 8 लाख 50 हजार रुपयांचे नुकसासन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर आग नक्की कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना समजताच त्यांनी शाहू चौकात घटनास्थळी मंगळवारी सकाळी 8 वाजता भेट देऊन पाहणी केली व दुकानाचे मालक धन्यकुमार शहा व चिमणलाल शहा यांच्याशी चर्चा केली.