दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२३ । फलटण ।
नीरा उजव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम जलसंपदा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अस्तरीकरणाच्या विरोधात फलटण तालुक्यामधील तडवळे ते राजाळे या पट्ट्यामधील शेतकऱ्यांनी मोठा लढा उभारलेला आहे. आज तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता. यामध्ये सुमारे 200 ट्रॅक्टर सहभागी झाले होते. यासोबतच महिला शेतकऱ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय होती. अस्तरीकरण थांबवण्याचा निर्णय जोपर्यंत शासन घेणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
फलटण येथील अधिकारगृहावर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता. यावेळी फलटण तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार अभिजीत जाधव, पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्यासह जलसंपदा विभागाचे विविध अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यात निरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण सुरू करण्यात आलेले आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असून जर अस्तरीकरणाचे काम थांबले नाही; तर शेतकऱ्यांच्या पुढच्या अनेक पिढ्या ह्या शेती करू शकणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांचे कुटुंब शेतीवर चालते अशा शेतकऱ्यांना तर मोठा फटका बसणार असल्याची भावना यावेळी महिला शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.