स्थैर्य, पुणे, दि.८: भारतीय रेडिओ
खगोलशास्त्रचे जनक मानले जाणारे प्रसिद्ध रेडिओ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद
स्वरूप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ. स्वरूप यांच्यावर पुण्यातील
रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी रात्री उशिरा
त्यांचे निधन झाले. मागील दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते.
मृत्यूसमयी त्यांचे वय ९१ वर्ष होते.
स्वरूप यांनी अलाहाबाद येथून विज्ञानाची
पदवी प्राप्त केली होती. तर १९५२मध्ये ऑस्ट्रेलियातल्या सी.एस.आय.आर.ओ. या
संस्थेत खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. ऑस्ट्रेलियातल्या पॉल हिल येथे
उभारलेल्या पॅराबोलीक अँटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण
उभारण्यात आली होती. तसेच उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली होती.
उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर पुण्याजवळील खोडद – नारायणगाव येथे जगातील
दुस-या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले होते.