
दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२३ | कुडाळ |
रावे कार्यक्रमाअंतर्गत माणगाव (ता. कुडाळ) गावामध्ये कृषी महाविद्यालय दापोलीच्या कृषी सह्याद्री गट व ग्रामपंचायत माणगाव यांच्यामार्फत भात उत्पादक शेतकर्यांकरीता प्रत्यारोपणासाठी अभियांत्रिकी उपकरणांचे प्रात्यक्षिक आयोजित केले गेले. हेे मार्गदर्शन कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सचिन पाठक सर यांनी केले.
या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये यंत्राद्वारे भात लागवड व त्याचे शेतकरी व शेतीस होणारे फायदे तसेच मजुरांवर होणारा खर्च कमी करून आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी व भातशेती फक्त घरापुरतीच न करता ती कमीतकमी खर्चामध्ये अधिक नफा देणारी असावी, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन व चर्चा झाली.
या कार्यक्रमास माणगाव गावातील ४० शेतकरी उपस्थित होते. कृषी सह्याद्री गटाच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत माणगाव यांचें मोलाचे सहकार्य लाभले. यासोबतच कृषी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, केंद्रप्रमुख डॉ. संदीप गुरव, कार्यक्रमाधिकारी डॉ. रणजित देव्हारे, विषय विशेषज्ञ डॉ. सचिन पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.