दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । सातारा । साताऱ्यावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे. निसर्गाचे नानाविष्कार पाहून मन मोहित होवून जाते. याच साताऱ्यातील एक विलोभनीय गाव म्हणजे ठोसेघर. ठोसेघर चे नाव घेतले की समोर येतो तो प्रसिद्ध फेसाळणारा धबधबा. आता हेच दुर्गम भागातील पर्यटनस्थळ अजून एका गोष्टीमुळे महाराष्ट्रभर ख्याती मिळवत आहे ती म्हणजे ‘कोहिनूर शतावरी उद्योग‘. वयाची साठी पार केलेल्या एका आजीबाईने स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना हाताशी धरून आयुर्वेदात शंभर गुणी औषधी म्हणून परिचित असणाऱ्या शतावरीवर प्रक्रिया करून उभारलेल्या ‘कोहिनूर शतावरी’ या यशस्वी उद्योगाची ही यशोगाथा आहे.
‘शहनाझ शेख’ या आजींची ही एक प्रेरणादायी यशकथा आहे. शहनाझ आजी या सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. आरोग्य विभागात कार्यरत असतानाच त्यांना उत्तम आरोग्याचे महत्व समजले व आरोग्यवर्धक घटकांची माहितीही मिळत गेली. त्यांची स्वत:ची नवजात नात ही कमी वजनाची होती, तिला पौष्टिक व आरोग्यवर्धक औषधी करावी म्हणून आजीने शतावरीची मुळे आणून घरच्याघरी प्रक्रिया करून आपल्या नातीसाठी शतावरी चूर्ण बनवले आणि पुढे त्याचा अपेक्षित परिणाम होत गेला.
गावच्या बाकीच्या महिला आजीला शतावरी बनवून मागू लागल्या अशा पद्धतीने या ‘कोहिनूर शतावरी’ व्यवसायाची पाळेमुळे रोवली गेली. आजींना जेव्हा महिला स्वयंसहाय्यता समूहाची संकल्पना कळली तेव्हा त्यांनी ठोसेघरमधील गरजू महिलांना एकत्र करून ‘महाराष्ट्र सह्याद्री एकता’ नावाचा स्वयंसहाय्यता समूह स्थापन केला. शासकीय नियमांनुसार समूहाचे कामकाज चालू ठेवले. नियमित बचत, नियमित बैठका, अंतर्गत कर्ज व्यवहार व त्यांची नियमित परतफेड या मुलभूत गोष्टी समूहातील सदस्यांच्या अंगवळणी पडत गेल्या.
समूहाच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांपर्यंत जावून त्यांनी शतावरीच्या पिकाचे महत्व व आर्थिक गणित समजावून सांगितले. शेतकऱ्यांना शतावरीचे पिक घेण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे सध्याच्या घडीला ‘कोहिनूर शतावरी’ उद्योगासाठी शतावरी पिकाचे उत्पादन गावातूनच घेतले जाते. यातून गावातील शेतकऱ्यांना किफायतशीर फायदा होत आहे.
‘कोहिनूर शतावरी’ ची उत्पादने मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी सुरळीतपणे उपलब्ध करण्यासाठी अन्न व औषध विभागाचा परवाना, उद्योग आधार इ. आधारभूत गोष्टींची शहनाझ आजींनी पुर्तता केली. सातारा तालुका उमेद अभियान कक्षातील अधिकाऱ्यांच्या मदतीतून त्यांनी विविध अडचणीवर सुद्धा यशस्वीपणे मात केली. शतावरीवर प्रक्रिया करताना त्यातील औषधी गुणधर्म कायम राहतील, ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी चव, स्वच्छता व टापटीप या बाबींकडे समूहातील प्रत्येक सदस्यांकडून विशेष लक्ष पुरविण्यात येते. बनविलेल्या उत्पादनाची गुणवत्ता ग्राहकांच्या अपेक्षेस पात्र ठरावी यासाठी उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांवर योग्य ती खबरदारी घेतली जाते. प्रत्यक्ष उद्योग क्षेत्राला तुम्ही भेट दिली तर तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही अंगात अॅप्रेन, डोक्याला प्लास्टिक आवरण व हातामध्ये ग्लोव्हज् घालून काम करत आहे. खरे तर एका दुर्गम ग्रामीण भागात एखाद्या उद्योगात असे चित्र पहायला मिळणे दुरापास्त झाले आहे.
बनवलेले शतावरी चूर्ण ग्राहकांसाठी वेगवेगळ्या वजनामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. उत्पादनाचे लेबलिंग व पॅकेजिंग सुद्धा आताच्या मार्केटिंग च्या जमान्याला अनुसरून आकर्षकपणे करण्यात आलेले आहे. शहनाझ आजी सांगतात की सुरुवातींच्या दिवसामध्ये त्या व समूहातील महिला या गावोगावी जावून प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायती, मेडिकल्स, शाळा त्याचप्रमाणे लोकांच्या घरोघरी जावून उत्पादनांची विक्री करत होत्या. आता मात्र काही कंपन्या स्वत:हून मोठ्या प्रमाणावर उत्पादन विकत घेत आहेत. सातारा शहरातील अनेक व्यक्ती स्वत:हून ठोसेघर येथून शतावरी विकत घेत आहेत. उमेद अभियानाच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र सह्याद्री एकता’ स्वयंसहाय्यता समूह हा वेगवेगळ्या प्रदर्शनात सामील झालेला आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शनासाठी दिल्लीवारी करून आलेला आहे. दिल्ली प्रदर्शनात त्यांनी आपल्या उत्पादनांची खूप मोठ्या प्रमाणावर विक्री केलेली आहे. आजही दिल्लीतील काही ग्राहकांना कुरियरच्या माध्यमातून उत्पादन विकले जात आहे. भविष्यात सातारा शहरातील सुपर मार्केट्स, मॉल्स त्याचबरोबर ई-कॉमर्स कंपन्या सोबत हातमिळवणी करत व्यवसायवृद्धी करण्याचा मानस असल्याचे शहनाझ आजी बोलून दाखवितात.
गावातील साधारणपणे ३० महिलांना या उद्योगामुळे बारमाही रोजगार प्राप्त झालेला आहे. शहनाझ आजींना याकामी त्यांच्या मुलाची व सुनेची खूप मोलाची साथ मिळत आहे. ठोसेघर गावातील महिलांसाठी या आजीबाई त्यांच्या कुटुंबातील एक भाग आहेत व त्या महिलांसाठी खूप मोठा आधार आहेत. आपल्यासोबत आपल्या गावातील लेकीबाळींचे आयुष्य सुद्धा सुखकर व्हावे या आग्रहापोटी या वयाची साठी पार केलेल्या आजीबाईंची धडपड चालू असते. आपल्या नातीसाठी तयार केलेल्या 1 किलो शतावरी ने आता खूप मोठा पल्ला गाठला आहे, आता हे उत्पादन महिन्याला २० टनापर्यंत पोहोचले आहे या उद्योगातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे. ‘महाराष्ट्र सह्याद्री एकता’ च्या सहकार्याने सुरु असणाऱ्या या उद्योगाची दखल वृत्त वाहिन्यांनी देखील घेतली आहे. या साऱ्या प्रवासातील श्रेय देताना शहनाझ आजी सातारा तालुका उमेद अभियान कक्ष व सातारा आयुर्वेद विभाग यांचा आवर्जून उल्लेख करतात.