घराचे घरपण हे दारातील अंगण ,तुळशी वृंदावन, सडा रांगोळी, वृक्ष वेली ह्याने जसं शोभून दिसतं .तसंच घर छोटे असो मोठे असू त्यात एका बाजूला विराजमन झालेलं जातें पाहिले की घर भरून जाते. प्रसिद्ध कुरुंद दगडाच्या घडीव दोन पाळ्या मंजे जातीवंत जातें जीवनाच बरंच सारं सांगत.
कोंबड्याने बांग दिली,
बाय गं मला जाग आली,
सुप्पात जोंधळे घोळीते,
जात्यावर दळण दळीते
हे खरं जीवनाचे दळणवळण होते.जातें खालची पाळी स्थिर तर वरची फिरणारी हे जगण्याच तत्वज्ञान सांगणारी रित आहे.नांदायला आलेल्या सुवासनीने सासरी स्थिर राहून माहेरी फिरून यावं.सासरी रमावं अन् माहेरी वावरावे.माहेरच संस्कार सासरी आल्यावर रुजवणे हीच जातेंरुपी सोहळा सांगतो.विवाहाच्या आदि घाणा पूजनांत जातें मनाचा भाव खातें.जातेंच्या गळ्याला हळकूंड धनं सुपारी नाणं हेच लेणं लेवून विवाह संपन्न होतो.
जातेंची खालची स्थिर पाळी मंजे परमार्थ अन् वरची गरगर फिरणारी प्रपंच करी.संसारात कितीही पळाले तरी पुरतं नाही.प्रपंच अन् परमार्थ यांची सांगड जातेंरुपी नाते सांगते.
जातेंरुपी एका तोंडातून तीन द्वारी धान्य भरडले जाणे मंजे खरं जगणं होय.ब्रह्मा विष्णू महेश,सकाळ दुपार संध्याकाळ ,बालपण तरूणपण म्हातारपण, जन्म जगणं मरणं यांचे जणू जातें प्रतिकच आहे.
सासरी नांदणा-या सौभाग्यवतीची घुसमट प्रकट करण्याचे साधन मंजे जातें.ओवीबद्ध रचनेतून जगणं भोगणं सोसणे हेही जातें सांगून जाते.अहंकार रुपी धान्याचे सात्त्विक पीठ तयार करण्याचे सामर्थ्य या जात्यात आहे.कुटुंबातील हुंदके स्फुदंणे हसणे खेळणे याचे मूक साक्षीदार हा जातेंरुपी साधन आहे.जात्यातून जाणे मंजे जगण्याची सत्वपरीक्षा देणं.जात्याचा एकच खुंटा जणू आपण एकच आहोत , हेच सांगतो.भाकरीचा आकार लहान मोठा असेल.पण भूक भागविणे हेच महत्तम कार्य सुरू असते.जातें जातं मगे कीर्त रहातं.नव्या पिढीला हे घरच घरपण जपणारे, कुटुंबाचा धागा अखंडीत ठेवणारे हे जातें लोप न पावता जतन करावे.ही आपली संस्कृती जतन व्हावे.संत कवयित्री जनाई अभंगातून गाते,
सुंदर माझे जातें ग फिरते बहुतुके
ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला
मानवा, तू जाता मागे काय रहाते.तर कीर्त कौतुकानं गाऊ तुझ्या कार्याचा महिमा.