दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । राज्यातील ऊस पट्ट्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या 15 नोव्हेंबरला होणार्या सुरू होणार्या नियोजित गळीत हंगामाला ’ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे ऊस सर्यांमध्ये पाणी साचून आहे. परिणामी तोडणी पंधरा दिवस तरी लांबणीवर जाईल, अशी शक्यता आहे.
राज्याच्या अनेक भागांत परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच भाजीपाला, फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. भारतातून मान्सून परतण्यास पोषक हवामान होत आहे. त्यामुळे आजदेखील आजदेखील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, नांदेड. विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. या विभागात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली आहे.
पावसामुळे सकल भागात पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरिया सारख्या आजाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा नागरिकांनी निचरा करावा व आपला परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जोरदार पावसाच्या सरीने चाकरमाने, व्यावसायिक, वाहनधारकांची, पादचार्यांची आणि पर्यटकांची चांगलीच त्रेधा उडवली.