अमेय आणि श्रेयस च्या सुरेल अभंग वाणीने मोहरली सज्जनगडची संध्याकाळ

शनिवार दि. 7 फेब्रुवारी नंदकुमार कर्वे बुवा यांचे कीर्तन , सौ.राजश्री वैरागकर व अजिंक्य पोंक्षे यांचे सुश्राव्य गायन.


सज्जनगड  – अभंगवाणी सादर करताना अमेय कारुळकर व श्रेयस व्यास (छाया -अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, 6 जानेवारी, सातारा – श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आयोजित दासनवमी संगीत महोत्सवात चौथे गायन पुष्प सादर करताना मुलुंड येथील अमेय कारुळकर आणि डोंबिवली येथील श्रेयस व्यास यांच्या अभंग वाणीने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. आपल्या गायन सेवेचा प्रारंभ या दोघांनी समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या ..आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ..या गीताने केली .त्यानंतर पंडित सुरेश बापट हे या दोघांचे गुरु ,त्यांच्या….रामकृष्ण हरि गोविंद ..व ..रामनाम धरा कंठी.. या दोन रचना सादर करून पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली ..रामाचे भजन . .. रचना सादर केली. आपले पाचवे गीत सादर करताना दादा गुरु अशोकदा रानडे यांनी स्वरबद्ध केलेली समर्थांची आणखी एक रचना…वाजे पाऊल आपले.. सादर करून सुरेश बापट यांची ..कृपावंत भला ..म्हणताना आपल्या स्वर साधनेचा व गायन कलेचा प्रत्यय दिला.

एकनाथ महाराजांची घागबुवा यांनी प्रसिद्ध केलेली ..चिंचेच्या पानावर ..रचनेचे सुरेख सादरीकरण करून नंतर नामदेव महाराजांच्या ..यारे नाचू प्रेमानंदे..ला उपस्थित सर्व श्रोतेनी टाळ्यांचा गजर केला .सुरेश बापट यांचीच रचना असलेली ..देव माझा ,मी देवाचा..सादर करून ..विठ्ठल गीती गावा .. ही पंडित सुरेश हळदणकर यांच्या चालीतील रचना सादर करत पंडित सूरदास यांचे ..विदुर घरा.. हे भजन सादर करून नाथ महाराजांचे हिंदी भजन ..गुरुकृपा अंजना पायो रे पायो मेरे भाई.. ही भैरवी आळवत आपल्या गायन सेवेची सांगता केली .

यावेळी अमेय व श्रेयस यांना तबला साथ अभिनव जोशी यांची होती पखवाजाची साथ गणेश मेस्त्री यांची होती. व्हायोलिन वर उदय गोखले तर ऑर्गनवर सुशील गद्रे साथ करत होते .

अतिशय रंगलेल्या अशा या गायन सेवेनंतर या सर्व गायक वादक कलाकारांचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने मंडळाचे श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.गुरुनाथ महाराज कोटणीस व जेष्ठ निरूपणकार व सज्जनगड मासिकाचे संपादक प्रा.डॉ.अजित कुलकर्णी यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ रामनामी व समर्थ प्रसाद देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी केले. या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून उपस्थित असलेल्या समर्थ भक्तांची मोठी उपस्थिती होती.

उद्या दि. 7 फेब्रुवारी रोजी पनवेल येथील ह. भ .प. नंदकुमार कर्वे बुवा यांचे कीर्तन होणार आहे . पुणे येथील सौ.राजश्री वैरागकर व ठाणे येथील अजिंक्य पोंक्षे यांचे सुश्राव्य गायन होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन पूर्वा पेठे या करणार असून तबला साथ सुहास चितळे, पखवाजावर साथ गणेश मिस्त्री, संवादिनीवर साथ हर्षल काटदरे, ऑर्गनवर साथ सुशील गद्रे, वायोलिन वर उदय गोखले यांची साथ राहणार आहे .


Back to top button
Don`t copy text!