
दैनिक स्थैर्य | दि. १ एप्रिल २०२३ | फलटण | बहुप्रतिक्षित फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगुल अखेर वाजला आहे. दि.30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. सद्या असलेली मताची आकडेमोड करता विरोधकांना बाजार समितीमध्ये चंचुप्रवेश करणे सुद्धा अश्यक्यप्राय मानले जात तर सत्ताधारी राजे गटापुढे गटबाजी रोखणेच मोठे आव्हान आहे. पाण्याच्या मुद्यावरुन तापलेल्या राजकीय वातावरणात शेतकर्यांच्या जिव्हाळ्याची असलेली बाजार समितीची निवडणूक पार पडणार असून या निवडणूकीमध्ये सत्ता राखण्यासाठी राजे गटाची रणनिती कशी राहणार आणि मतांच्या बेरजेसाठी निवडणूकीत खासदार गटाची काय भूमिका राहणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. यानिमित्ताने फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घालतेल्या निवडणूकीचा थोडक्यात आढावा घेतला आहे, दैनिक ‘स्थैर्य’चे संपादक प्रसन्न रुद्रभटे यांनी…..
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम काही दिवसांपूर्वी जाहीर झाला असून या निवडणूकीद्वारे बाजार समितीच्या संचालक मंडळावर 18 संचालक निवडून द्यावयाचे आहेत. या निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार दि. 27 मार्च ते दि. 3 एप्रिल दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणे, दि. 5 एप्रिल रोजी सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी दुपारी 12 वाजले पासून छाननी संपेपर्यंत, दि. 6 ते 20 एप्रिल दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात (निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण यांचे कार्यालय राहील.) उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, दि. 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करणे, दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत मतदान आणि त्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. (मतदान व मतमोजणी ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे.)
निवडणूकीसाठी असे आहेत मतदारसंघ
- सोसायटी मतदार संघ 11 संचालक निवडून द्यावयाचे त्यापैकी सर्वसाधारण 7, महिला 2, इतर मागास प्रवर्ग 1, भटक्या विमुक्त जाती जमाती 1.
- ग्रामपंचायत मतदार संघ 4 संचालक निवडून द्यावयाचे त्यापैकी सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1, आर्थिक दुर्बल 1.
- व्यापारी अडते मतदार संघ 2 संचालक निवडून द्यावयाचे आहेत.
- हमाल मापाडी मतदार संघ 1 संचालक निवडून द्यावयाचा आहे. असे एकूण 18 संचालक निवडून द्यावयाचे आहेत. सोसायटी व ग्रामपंचायत मधील शेतकरी सदस्य सदर निवडणूक लढवू शकतात.
मतदार संघ निहाय मतदार संख्या
सोसायटी मतदार संघ 1634, ग्रामपंचायत मतदार संघ 1187, व्यापारी व अडते 82, हमाल मापाडी 39 असे एकूण 2942 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी तहसीलदार यांचा दाखला आवश्यक तर आरक्षित जागांसाठी जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता पत्र आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 21 वर्षे पूर्ण असल्याचा वयाचा पुरावा तसेच रहिवासी व शेतकरी असल्याचा पुरावा दाखल करावा लागणार आहे. उमेदवार सूचक व अनुमोदक हे मतदार यादीतील असायला हवेत आणि प्रत्येकाला एक वेळ सूचक किंवा अनुमोदक होता येईल.
ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या खंबीर साथीमधून श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रात ‘रोल मॉडेल’ बनवली. यामुळे बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून जाण्यासाठी तालुक्यातील अनेकजणांनी आधिपासूनच फिल्डींग लावायला सुरुवात केलेली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा विचार करता जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीची उमेदवारी देताना जिल्हा परिषद गटातील किंवा पंचायत समिती गणांमधील मोठी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये उमेदवारी देणे गरजेचे राहते. परंतु बाजार समिती सारख्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती गणातील एखाद्या छोट्या गावांमध्येही काम करत असणार्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यास बाजार समितीच्या माध्यमातून तालुकास्तरावर काम करण्याचा अनुभव एखाद्या छोट्या गावातील कार्यकर्त्याला सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे आगामी काळामध्ये बाजार समितीचे निवडणुकीला उमेदवार देताना लहान गावातील कार्यकर्त्यांचा सुद्धा विचार केला जावा अशी मागणी दबक्या आवाजात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटामध्ये सुरू आहे.
बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका संपन्न होणार आहेत. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पुढचे राजकारण सोपे जाण्यासाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय कार्यकर्त्यांना बाजार समितीवर संधी दिल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजेगटाला नक्कीच फायदा होईल, असे बोलले जात आहे.
फलटण तालुक्यामधील सोसायटी मतदारसंघ व ग्रामपंचायत मतदारसंघाचा विचार करता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप बाजार समितीच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरणार कां? याबाबतही राजकीय वर्तृळात उत्स्तूकता असून भाजपचा बाजार समितीमध्ये चचूं प्रवेश करण्यासाठीसुद्धा संपूर्ण ताकद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लावावी लागणार आहे. शिवाय मतदारांची गोळाबेरीज पहाता हा प्रवेश काही अंशी अशक्यप्राय मानला जात आहे.
सध्या सोसायटी मतदार संघामधून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजेगटाचे नेते व बाजार समितीचे माजी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे सांगवी सोसायटीमधून निवडरून आलेले होते व येत्या निवडणूकीतही ते याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा दिलेला होता. त्याच धर्तीवर बाजार समितीच्या संचालक पदी काम करण्यासाठी ते स्वत: पुन्हा उभे राहणार की, आपल्या निकटच्या कार्यकर्त्याला आसू सोसायटी गटामधून बाजार समितीसाठी संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आंदरुड सोसायटी गटामधून स्व.विनायकराव पाटील यांनी बाजार समितीवर प्रतिनिधीत्व केलेले होते. येत्या निवडणूकीमध्ये आंदरुडच्या पाटील कुटूंबाला पुन्हा राजकारणामध्ये सक्रीय करण्यासाठी स्व.विनायक पाटील यांचे चिरंजीव शंभुराज पाटील यांना बाजार समितीवर संचालक म्हणून संधी दिली जाणार कां? याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
निंभोरे सोसायटी गटामधून स्वर्गीय बाळासाहेब रणवरे हे बाजार समितीवर गत निवडणूकीत निवडून गेले होते. आगामी काळामध्ये निंभोरे सोसायटी गटामधून बाजार समितीसाठी उमेदवार निवडताना आगामी साखरवाडी गणाची पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवावी लागणार आहे. श्रीमंत रामराजे यांनी साखरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल लक्षात घेता साखरवाडी पंचायत समिती गणामध्ये विरोधकांचा टक्का वाढू न देण्यासाठी गटांतर्गत बंड करु पाहणार्या एखाद्या कार्यकर्त्याला बाजार समितीवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
तावडी सोसायटी मधून गतवेळेस मोहनराव निंबाळकर हे बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले होते. आगामी काळामध्ये मोहनराव निंबाळकर यांना पुन्हा संधी मिळणार? की मध्यंतरीच्या घडामोडींमुळे या ठिकाणी उमेदवार म्हणून नवीन चेहरा पहायला मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ढवळ सोसायटीमधील स्वर्गीय लक्ष्मण लोखंडे हे बाजार समितीवर प्रतिनिधीत्व करीत होते. त्यानंतर आता त्यांचे सुपूत्र सचिन लोखंडे यांनाच प्रबळ दावेदार मानले जात आहे.
गुणवरे सोसायटीमधून सौ.कमलताई लंगुटे व रावडी बुद्रुक सोसायटीमधून सौ.लताताई सुळ या दोन्ही महिला प्रतिनिधी बाजार समितीवर सलग दोन टर्म म्हणजेच 10 वर्षे प्रतिनिधीत्व करीत आहेत. आगामी काळात पुन्हा यांनाच संधी मिळणार की ? अन्य कुणाला संधी मिळणार? याबाबतही विविध अंदाज बांधले जात आहेत.
अलगुडेवाडी सोसायटीमधून प्रकाश भोंगळे, गवळीनगर सोसायटीमधून बबन खोमणे तर सरडे सोसायटीमधून भिमराव शेंडगे यांना संधी देण्यात आली होती आगामी काळात या ठिकाणी हेच पुन्हा संचालक होणार की अन्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामपंचायत सदस्य मतदार संघामधून बाजार समितीचे विद्यमान व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, धुळदेव येथील परशुराम फरांदे, हणमंतवाडी येथील प्रकाश धाईंचे व टाकळवाडा येथील विजयकुमार शेडगे हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तरी आगामी निवडणूकीत या मतदार संघांमधून कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. विशेषत: कर्मचार्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने बाजार समितीच्या कारभारात सुसूत्रता पहायला मिळत असते. त्यामुळे विद्यमान संचालकांपैकी पुन्हा संधी मिळणार्यांमध्ये भगवानराव होळकर यांचे नाव नक्की मानले जात आहे.
व्यापारी प्रतिनिधी मतदार संघामधून संजय कदम व समर जाधव हे सध्या प्रतिनिधीत्व करीत आहेत. आगामी काळामध्ये व्यापार्यांमधून कुणाला पसंती मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, या मतदार संघातून जैन समाजातील व्यापारी बांधवाला संधी देण्यात यावी अशी जोरदार मागणी श्रेष्ठींकडे केली जात असल्याची चर्चा बाजार समितीच्या राजकीय वर्तृळात दबक्या आवाजात सुरु आहे.
हमाल मापाडी मतदार संघामधून स्वर्गीय बापू करे व निलेश कापसे हे सध्याच्या संचालक मंडळात प्रतिनिधीत्व करीत होते. आता होऊ घातलेल्या निवडणूकीत जुन्यांनाच संधी मिळणार की नवीन चेहरे पहायला मिळणार याकडेही लक्ष लागून राहिलेले आहे.
फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून नियुक्त केले जाणारे संचालकांपैकी विद्यमान संचालक चांगदेव खरात हे आहेत. आगामी काळामध्ये पंचायत समिती नियुक्त संचालक हे राहणार नाहीत. तरी चांगदेव खरात यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी देणार की त्यांची जागा दुसर्या कोणाला देणार ? याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे.
बाजार समितीवर पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचीच सत्ता बिनदिक्कतपणे येणार असल्याचे राजकीय जाणकार बोलत असले तरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या निवडणूकीसाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर कोणाला संधी देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.