गांधी विचारांनी संपूर्ण जग प्रभावित झाले आहे – न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । पुणे । महात्मा गांधी ही केवळ व्यक्ती नसून ती एक विचारधारा आहे. गांधींचे विचार हे एखाद्या प्रांतापुरते किंवा विशिष्ठ समूहासाठी मर्यादित नाहीत. त्यामुळे संपूर्ण जग गांधी विचारांनी प्रभावित झाले असून जगातील अनेक देश गांधींच्या विचारांनी मार्गक्रमण करीत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी केले.
जेष्ठ विचारवंत, माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी लिहिलेल्या ‘महात्मा गांधी आणि जग’ या पुस्तकाचे प्रकाशन न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दिपक टिळक समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी तनया ईशा प्रकाशनचे प्रविण वाळींबे, महाराष्ट्र गांधी स्मारक ट्रस्टचे विश्वस्त अभय छाजेड, माजी संपादक विजय कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे येथील बाल गंधर्व कलादानात हा समारंभ झाला. कलादालनात जगभरातील विविध सत्तर देशांत उभारलेल्या गांधीजींच्या पुतळ्यांचे व एकशे चाळीस देशांनी काढलेल्या टपाल तिकिटांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचे उदघाटनही यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना धर्माधिकारी यांनी गांधीजींच्या विचारांचे अनेक बारकावे उलगडून सांगितले. गांधीजींनी मांडलेले विचार आणि त्यांचे प्रत्यक्ष जीवन यामध्ये कधीही अंतर पडले नाही त्यामुळे त्यांच्या विचारांचा विलक्षण प्रभाव जनमनावर पडला. जगातील अनेक देशातील विचारवंत, तत्वज्ञानी, राज्यकर्ते, सामाजिक चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते, उच्चपदस्थ अधिकारी गांधींचे अनुयायी झाले. परंतू खऱ्या अर्थाने गांधीजी व गांधी विचार कोणालाच नीट समजून घेता आले नाहीत. गांधीजींची महती सांगताना आधी गांधी विचार आपल्या मनात किती रुजला आहे हे प्रत्येकाने तपासून पाहावे असे सांगून धर्माधिकारी यांनी उल्हासदादांनी अगदी योग्य वेळी हे पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
यावेळी पुस्तकाचे लेखक उल्हासदादा पवार यांनी पुस्तकाचे प्रकाशन 9 ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून होत असल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला.  जगातील जवळपास सर्व देशांनी त्यांच्या भूमीत महात्मा गांधींचे पुतळे उभारले व त्यांच्या छायाचित्राचे टपाल तिकीटही छापले आहे असे सांगून उल्हास पवार म्हणाले की, एवढा मोठा सन्मान मिळवणारे गांधी हे जगातील एकमेव युगपुरुष आहेत. डॉ. दिपक टिळक यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, टिळक व गांधींनी देशासाठी दिलेले योगदान फार मोठे असून त्यांचे कार्य आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.
कार्यक्रमाचे संयोजक अभय छाजेड यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रविण वाळींबे यांनी प्रास्ताविक करताना हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिल्याबद्दल उल्हास पवार यांना धन्यवाद दिले. यावेळी माजी आमदार दिप्ती चौधरी, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते आबा बागुल, प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार, जेष्ठ विधिज्ञ असीम सरोदे, जेष्ठ पत्रकार अरुण खोरे, जलतज्ञ अनिल पाटील तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!