
पुसेगाव – श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पुजन करताना आ महेश शिंदे ,आ शशिकांत शिंदे , आ मनोज घोरपडे, चेअरमन संतोष वाघ, सर्व विश्वस्त व मान्यवर . दुसर्या छायाचित्रात सेवागिरी महाराजांच्या रथाची सवाद्य भव्य मिरवणूक आणि नोटांनी शृंगारलेला रथ. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, सातारा, दि. 18 डिसेंबर : परमपूज्य सदगुरु श्री सेवागिरी महाराज की जय ओम नमो नारायणा च्या जय घोषात,बेलफुलांची उधळण करत मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात गुरुवारी श्री सेवागिरी महाराजांचा 78वा रथोत्सव सोहळा संपन्न झाला. टाळ मृदंग, ढोल ताशे भजन, बॅण्डचा निनाद आणि श्री सेवागिरी महाराजांच्या चरित्रावरील गीतांमुळे पुसेगाव सुवर्णनगरी सेवागिरीमय झाली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात व इतर राज्यामधील सुमारे 7 ते 8 लाखाहून अधिक भाविक तसेच यात्रेकरुंनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
पहाटे श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत श्री सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ विश्वस्त डॉ सुरेश जाधव रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव,सचिन देशमुख,गौरव जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. प्रारंभी फुलांनी सजवलेल्या रथामध्ये श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळी साडे नऊ वाजता कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ शशिकांत शिंदे आ मनोज घोरपडे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते रथपूजन झाले.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ , विश्वस्त डॉ . सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव , सचिन देशमुख, गौरव जाधव,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई , प्रांताधिकारी उज्वला गाडेकर , जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे , तहसीलदार बाई माने , गटविकास अधिकारी योगेश कदम, प्रभारी सरपंच विशाल जाधव, ग्रामपंचायत अधिकारी अर्जुन नागरगोजे सर्व सदस्य, देवस्थानचे माजी चेअरमन व माजी विश्वस्त, ग्रामस्थ, भाविक, यात्रेकरु उपस्थित होते
रथ मिरवणूकीस सकाळी साडे दहा वाजता प्रत्यक्षात प्रारंभ झाला. यावेळी टाळमृदगांच्या गजरात , हलगी ढोलताशे व बॅण्डपथकाच्या निनादामुळे सर्व वातावरण सेवागिरीमय झाले होते. दर्शनाला येणार्या भाविकांनी मोठ्या श्रध्देने नारळ, बेलफुल, पुष्पहार, पेढे व नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्याने सकाळी 11 वाजताच रथ नोटांनी शृंगारला होता. भाविकांनी श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी आज पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. श्री सेवागिरी मंदिरात ट्रस्टच्यावतीने भक्तांना बुंदी प्रसादाचे मोफत वाटप करण्यात येते होते. श्री सेवागिरी मंदीरास आकर्षक कलर व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथमिरवणूक मुख्यबाजारपेठेतून यात्रास्थळापर्यंत आणि पुन्हा पोहचली आणि परत पोस्ट कार्यालयमार्गे मंदिर अशी सुमारे अकरा तास रथ मिरवणूक चालली.
रथयात्रा संपल्यानंतर रथावरील नोटांच्या माळा व देणगी श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. यात्रेत बालगोपाळ, युवक, युवतींसह यात्रेकरुंनी पाळण्यात बसण्याचा आनंद लुटला. गरमागरम जिलेबी, फरसाणा व इतर मिठाईचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती. सौंदर्यप्रसाधने खरेदीसाठी युवती व महिलांची झुंबड उडलेली होती. विविध दुकानांमध्ये खरेदीसाठी यात्रेकरुंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी , अतिरिक्त अधीक्षक वैशाली कडुकर , यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजश्री तेरणी , सपोनि संदीप पोमण यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पुसेगाव ग्रामपंचायतीतर्फे यात्रेकरूंना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात येत आहे.

