स्थैर्य, सांगली, दि. 20 : वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे पुणे-बेंगलोर द्रुतगती मार्गालगतचे सेवा रस्त्याकडेची गटारी साफ करणाऱ्या जेसीबी खाली सापडून दोन वर्षीय चिमुकलीचा अंत झाला. भूमी सुरज पाटील असे या मृत बलिकेचे नाव आहे.ही घटना बुधवारी सकाळी पावणे दहा वाजता घडली.जेसीबी चालका विरुध्द कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेर्ले येथील सदा पाटील मळ्यातील सेवा रस्त्या कडेची गटारी काढण्याचे काम जेसीबी नं एम. एच.- ०९-सी.एल. ०३१८ च्या साह्याने सुरु होते. दोन दिवस सफाई सुरू होती. बुधवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जेसीबी चालक शिवाजी नागनाथ जाधव (रा. कालेटेक,ता. कराड) याने भरधाव वेगाने जेसीबी मागे घेतला. दरम्यान त्याचे नियंत्रण सुटले. या वेळी भूमी हिस धडक बसली. तिच्या डोक्यावरुन चाक गेल्याने ती जागीच गतप्राण झाली.या अपघातानंतर जेसीबी चालक पळून गेला. याप्रकरणी रामचंद्र बाळासाहेब पाटील यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.अधिक तपास हवालदार अफझल मुल्ला करीत आहेत.