शाळेतील बोलक्या भिंती आता जणू अबोल झाल्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २९ : हुबेहूब रेखाटलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील एखाद्या चित्रातून इतिहासाचे वर्णन करणार्‍या, नकाशाच्या माध्यमातून संपूर्ण जगाची भ्रमंती घडवतानाच आकड्यांच्या मदतीने गणिताची उजळणी घेणार्‍या, हे कराच; परंतु हे करू नका, असा मोलाचा सल्ला देत आपल्यातील मुलांसंबंधी असलेले नाते अधिक घट्ट करणार्‍या शाळेतील बोलक्या भिंती आता जणू अबोल झाल्या आहेत.

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाउनमुळे गावागावातील शाळा गेले काही महिने बंद असल्याने शाळेतील किलबिल बंद झाली आहे. मुलांच्या एकसुरातील आवाजाने दुमदुमून जाणारा शाळेचा परिसर अबोल झाला आहे. जून महिना सुरू झाला की मुलांना शाळेची चाहूल लागते. शाळा सुरू होताच मुले, शिक्षक व शाळा यांचे नाते अधिक घट्ट होत असते. शाळा, शिक्षक यांच्या प्रबोधनातून संस्कारातून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडत असते. यामध्ये विविध विषयांच्या माहितीने सजविलेल्या शाळेच्या भिंतींचे योगदान देखील तितकेच महत्त्वाचे असते. शाळेच्या भिंतीवरील इतिहासातील घडामोडींचे चित्ररूपी वर्णन, नकाशातून सूचित केलेले राज्य, देश, जगातील लोकजीवन व इतर माहिती, व्यवहारात आकडेमोड करताना उपयोगी पडणारे पाढे, इतर गणितीय माहिती, तर हे करा, ते करू नका, असा सल्ला देणारे संदेश या बाबी जीवनभरासाठी ज्ञानाची शिदोरी देत असतात. म्हणूनच या शाळेच्या भिंती प्रत्येक विद्यार्थ्याला बोलक्या वाटतात. सद्यस्थितीत उद्भवलेल्या  करोना   विषाणू संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेत असताना विद्यार्थ्यांशी घट्ट मैत्री जमणार्‍या शाळेच्या बोलक्या भिंती अबोल झाल्या आहेत.

दरम्यान, करोना विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे बहुतांशी शाळांनी घर बसल्या ऑनलाइन वर्गाला सुरवात केली आहे. परंतु प्रत्यक्ष शाळेत होणारे ज्ञानार्जन व मोबाईलच्या माध्यमातून होणारे ऑनलाइन क्लास याच्या तुलनात्मक आकलनातून शाळा परिसरातच शिक्षणासाठी निर्माण होणारे वातावरण तेथील परिसर व इतर घटक विद्यार्थ्यांसाठी अधिक पूरक ठरत असतात.

अध्ययन सार्थ व सुस्पष्ट करण्यासाठी चित्रे व साधनांची मदत होते. सचित्र कथेतील अधिक तपशील दीर्घोतर कालावधीपर्यंत मुलांच्या ध्यानात राहतो. अध्यापनात चित्रांचा वा फलकांचा उपयोग केल्यास विषयबोध चांगला होतो. त्यामुळेच शाळेच्या भिंतीवरील चित्रं मुलांना अधिक बोलकी वाटतात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!