दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । फलटण शहर व तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज फलटण येथील गजानन चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
माण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जात असताना आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा निषेध नोंदविला होता. जशास तसे उत्तर म्हणून आज फलटण शहरात त्याची प्रतिक्रिया म्हणून आज आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधी घोषणा देऊन व निषेध नोंदवून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी गोरेंच्या कार्यकर्त्यांना इशारा देण्यात आला की, श्रीमंत रामराजे फलटण तालुक्याची अस्मिता असून त्यांनी फलटण तालुक्याचा संपूर्ण कायापालट केला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा खोरेच्या माध्यमातून खूप मोठी जलक्रांती केली असून त्यांच्या विरोधी बोलण्याचे लायकी आमदार जयकुमार गोरे यांची नसून त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यापुढे श्रीमंत रामराजे यांच्या विरोधी कारण नसताना चुकीचे वर्तन केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असेही युवक कार्यकर्ते यांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.