दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा ते रायघरकडे जाणाऱ्या एस. टी चालकावर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान दारू प्राशन केलेल्या दोन अज्ञात इसमांनी कुऱ्हाडीने वार केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एस.टीच्या काचा फोडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चालक पद्माकर शेलार हे सातारहून रायघरकडे एस. टी. घेवून निघाले होते. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बोगद्याच्या बाहेर एका हॉटेलनजीक दोघेजण दुचाकी रस्त्यावरच लावून उभे होते. यावेळी चालकाने आवाज देऊनही त्यांनी गाडी बाजूला न घेतल्याने चालक पदमाकर शेलार हे खाली उतरले व त्यांनी रस्त्यात उभे केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी दोन इसमांबरोबर चालक व वाहकाचा वाद झाला. वाद वाढत गेल्याने त्यातील एकजण कुऱ्हाड घेवुन आला आणि पद्माकर शेलार यांच्या पायावर वार केला. एवढ्यावरच न थांबता एस.टी.च्या दिशेने दगडफेक करून एस.टी.च्या काचा फोडल्या. सुदैवाने या घटनेत प्रवासी जखमी झाला नाही. दगडफेक केल्यानंतर दोघांनीही घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची नोंद रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.