स्थैर्य, सातारा, दि. 20 : एका भरधाव स्वीफ्ट कारने उलटय़ा दिशेने चालवून दुचाक्यांचा चुराडा केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत झाली नव्हती. मात्र, या घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नशीब बलत्वर म्हणून मोठा अनर्थ टळल्याची चर्चा सुरु होती.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की सातारा लगतच्या एक व्यक्ती स्वीफ्ट कार भरधाव वेगाने दामटत चालला होता. उलटय़ा दिशेने त्याने ती कार दामटत तब्बल पाच ते सहा दुचाक्यांना ठोकर मारत तो तसाच पुढे चालला. या दरम्यान, मोठा आवाज झाला. यामध्ये दुचाक्यांचे मोठे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. धडक मारलेली ती कारही तेथेच थांबवून त्यांने तेथून पोबारा केल्याचे समजते. जखमी झालेल्या त्या दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची नोंद उशिरापर्यंत शाहुपूरी पोलिसात झाली नव्हती.