
स्थैर्य, फलटण, दि. २० सप्टेंबर : “दळणवळण व्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, चालक हा या व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे,” असे प्रतिपादन मोटार वाहन निरीक्षक श्री. मारुती चौगुले यांनी केले. चालक दिनाचे औचित्य साधून येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित ‘चालक-मालक दिन’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमासाठी शहरातील रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक श्री. मारुती चौगुले यांच्या हस्ते सर्व उपस्थित चालक-मालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. चालकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सुरक्षित वाहतुकीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असे श्री. चौगुले यांनी सांगितले. त्यांनी सर्व चालकांना वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक सर्वश्री दीपक पाटील, समीर वाघ, महेश पाटील, सहाय्यक निरीक्षक श्रीमती प्रीती गायकवाड, लिपिक श्री. उमाकांत दीक्षित, तसेच सर्वश्री करण लेंबे, सागर लाळगे, संतोष अहिरेकर, धीरज जाधव, प्रमोद शिंदे, सुरेश पवार उपस्थित होते.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष श्री. सनी कदम, माजी अध्यक्ष श्री. महेंद्र काकडे, सचिव श्री. उदय काकडे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमकार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री. आप्पा टेबरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. महेंद्र काकडे यांनी मानले.