“उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय”; – चित्रा वाघ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ मे २०२३ । मुंबई । शरद पवार यांचे लोक माझे सांगाती हे पुस्तक चांगलेच गाजले होते. या पुस्तकाचा आता दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. ऐन पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यातच शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पवारांनी आत्मचरित्रातून महाविकास आघाडी आणि शिवसेनेबाबतही भूमिका मांडली आहे. तर, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या चर्चांवरही पवारांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले.

मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो’, असं पवार यांनी पुस्तकातील पान नंबर ४१७ वर लिहिले आहे. यानंतर आता यावरून भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय” असं म्हणत खोचक टीका केली आहे. तसेच “मतांसाठी राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंची पवार साहेबांनी बोलती बंद केली, हे बरं झालं” असंही म्हटलं आहे.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मुंबई तोडण्याचा केंद्राचा कोणताही मानस नसल्याचं शरद पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहलंय…. उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय. मुंबई तोडण्याची भीती दाखवून वर्षानुवर्षे BMC लुटण्याचं काम केलं गेलंय. मतांसाठी राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंची पवार साहेबांनी बोलती बंद केली, हे बरं झालं….” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी पुस्तकात मांडलेल्या मतासंदर्भात उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच, महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, असेही स्पष्ट केले. ”मी माझ्या मतावर ठाम आहे, मी माझी मतं यापुढेही ठामपणे मांडतच राहणार आहे. मात्र, महाविकास आघाडीला माझ्याकडून कुठेही तडा जाणार नाही, एवढी काळजी मी घेईन,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


Back to top button
Don`t copy text!