दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । नागपूर । राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालय आणि संशोधन केंद्र, इंडियन कॅन्सर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यांमध्ये कॅन्सर स्क्रिनिंग प्रोग्रॅम राबविला जाणार आहे. सावनेर तालुक्यातील चिंचोली येथे आज विभागीय आयुक्त तथा कॅन्सर रिलीफ सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. माधवी खोडे- चवरे यांच्या हस्ते ग्रामीण भागातील कॅन्सर स्क्रिनिंग सेंटरचे उद्घाटन झाले.
इंडियन कॅन्सर सोसायटीचे उपसंचालक डॉ. प्रसाद राणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे, कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सहसचिव अरविंद धावड, सदस्य पूर्णिमा केदार, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. कृष्णा सिमनवार, चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री पेटकर यावेळी उपस्थित होत्या.
कर्करोग हा कोणालाही होवू शकतो, त्यामुळे तज्ज्ञांच्या पथकाकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे, कॅन्सरच्या बाबतीत तात्काळ निदान करुन त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करावे. राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलने ग्रामीण भागात स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करून दिली असून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती डॉ. खोडे-चवरे यांनी यावेळी केले.
कॅन्सर स्क्रिनिंग प्रोग्रॅम, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध उपचार सुविधांचा गरजूंनी लाभ घेण्याचे आव्हान डॉ. पूर्णिमा केदार यांनी केले.
कॅन्सर स्क्रिनिंग प्रोग्रॅम अंतर्गत 100 शिबिरांचे नियोजन असून यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, दांत शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग कर्मचारी यांचे पथक राहणार आहे. तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलतर्फे गरीव व गरजू रुग्णांसाठी विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्याचा लाभ घ्यावा असे डॉ. कृष्णा फिरके यांनी सांगितले आहे.