
दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। फलटण । तीन महिन्यात सर्वाधिक पाणी टंचाई माण तालुक्यात जाणवण्याचा अंदाज आहे. 89 गावे आणि 532 वाड्यांना झळ बसू शकते. तर फलटण तालुक्यात असणार्या 58 गावांमध्ये टंचाई जमवण्याचा नादाज व्यक्त केला जात आहे. यासोबतच कोरेगाव तालुक्यात 139 गावे 13 वाड्या, खटाव 32 गावे आणि 33 वाड्या, खंडाळा 6 गावे, जावळीत 33 गावे व 14 वाड्या महाबळेश्वरला 13 गावे आणि 7वाड्यांत, कन्हाड तालुक्यात 23 गावांत, तर पाटण तालुक्याला 58 गावे आणि 33 वाड्यांत झळ बसण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात यावर्षी टंचाईला मार्च महिन्यातच तोंड फुटले असून पुढील अडीच महिने दाहकता राहणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यानुसार एप्रिल ते जूनदरम्यान 473 गावे आणि 657 वाड्यांना टंचाईची झळ बसू शकते. यासाठी 14 कोटी 62 लाख खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी पाऊस अधिक पडला, तरी उन्हाळ्यात टंचाईची स्थिती जाणवतेच. त्यामुळे प्रशासनाकडून टंचाईच्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. त्यातच जिल्ह्यात गेल्या वर्षी वार्षिक सरासरीच्या 125 टक्के पाऊस झाला होता. पर्जन्यमान अधिक होऊनही यंदा टंचाई लवकरच जाणवू लागली आहे. कारण माण तालुक्यात मागील आठवड्यापासून शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू झालाय, तसेच टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडूनही संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावरून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलाय. या आराखड्यानुसार जिल्ह्यात यावर्षी टंचाई अधिक जाणवणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
प्रशासनाने एप्रिल ते जूनदरम्यानचा संभाव्य आराखडा तयार केला आहे. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलाय. हा आराखडा 14 कोटी 61 लाख 20 हजारांचा आहे. यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई जाणवू शकते. येथील टंचाई निवारणासाठी 8 कोटी 60 लाख 50 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. कोरेगाव तालुक्यात 2 कोटी 7 लाख, पाटणला सुमारे 1 कोटी 21 लाख खर्च होण्याचा अंदाज आहे, तसेच खटाव तालुक्यात 34 लाख, खंडाळा 7 लाख, फलटण तालुका 86 लाख 57 हजार, वाई 65 लाख 15 हजार, जावळीत 36 लाख तर कराडला 14 लाख 58 हजार, महाबळेश्वर तालुक्यातही 29 लाख 44 हजार रुपये टंचाईवर खर्च होण्याचा अंदाज आहे.