
स्थैर्य, सातारा, दि.१४: सातारा नगरपरिषदेच्या राजवाडा येथील जुन्या इमारतीची जीर्ण झालेली गॅलरी मंगळवार दि 13 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास कोसळली. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जीवीत हानी झाली नसल्याची माहिती सातारा उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी दिली.
या इमारतीला ऐतिहासीक महत्व आहे. सातारा नगरपरिषदेचे सुरूवातीचे कामकाज या ठिकाणी चालत असे. सध्य स्थितीला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे राजवाडा शाखेचे कार्यालय, तसेच सर्व श्रमीक कचरा वेचक संघाचे कार्यालय, तसेच तलाठी कार्यालय, सातारा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे गोडावून, व पालिकेचा हॉल आहे. दैनंदिन स्वरूपात येथे नागरिकांची कायमच वर्दळ असते. सुदैवाने रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी सुदैवाने झाली नाही.
याबाबत उपनगराध्यक्ष किशोर शिंदे म्हणाले, ही गॅलरी जीर्ण झाली होती. या गॅलरीच्या वर देखील अजून एक गॅलरीचा भाग आहे. येत्या काळात तो देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेच्यावतीने तो भाग आधीच सुरक्षिततेच्या दृष्टीने काढणार येणार आहे. सातारा जिल्ह्यासह शहरात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे या जीर्ण गॅलेरीला पडली असण्याची शक्यता आहे.
वास्तविक ऐतिहासिक महत्व असलेल्या या इमारतीच्या बाबतीत भविष्यकाळात धोरणात्मक निर्णय घेत असून लवकरच या जागेचा उपयोग आर्ट गॅलरीच्या अनुषंगाने करणार आहोत. मात्र अद्याप त्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याची माहिती कळवू, असेदेखील शिंदे म्हणाले. सातारा शहरातील जुन्या इमारती पावसात कोसळतात. नागरिकांनी देखील अशा धोकादायक इमारतीची माहिती पालिकेला कळवणे आवश्यक आहे. यामध्ये दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त आहे. सातारा नगरपालिकेने देखील अशा जुन्या इमारतीचा सर्वे करण्याचे काम केले आहे. धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटीसा पाठवल्या असून त्यांची व्यवस्था करण्यास देखील संबधितांना सुचित केले आहे.