दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । गुहागर । बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि वर्षावास मालिकेच्या सांगता समारंभाचा कार्यक्रम गाव आणि मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्याध्यक्ष विश्वनाथ कदम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, शृंगारतळी, मु. पोष्ट – जानावळे, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी याठिकाणी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० या कालावधीत चार सत्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिटणीस महेंद्र मोहिते, संजय तांबे यांनी केले तर प्रास्ताविक मुंबई विभागाचे कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी करून त्यानी संघाद्वारे समाजबांधवांना आर्थिक सबळीकरणाच्या दृष्टीने प्रगतीपथावर नेण्याकरता पतसंस्थेची निर्मिती लवकरच सदर स्मारकात करण्यात येत आहे अशी माहिती त्यानी दिली त्याचबरोबर संघाद्वारे आजवर झालेल्या विधायक कार्यक्रमांचा आढाव त्यांनी घेतला, सदर प्रसंगी संघाचे प्रमुख विश्वस्त संजय पवार, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, के. सी. जाधव, मुकुंद पवार त्याचबरोबर संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ पवार या मान्यवरांनी उपस्थित राहून आपले मौलिक विचार मांडले, सदर कार्यक्रमास गाव आणि मुंबई विभागाचे सर्व कार्यकर्ते, सभासद, सदस्य, महिला मंडळ, उपासक, उपासिका यांनी लक्षणीय उपस्थिती लावून रेकॉर्डब्रेक जनसागर लोटला होता, आजवर इतक्या मोठ्या प्रमाणात समुदाय इतर कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहिला नव्हता.
स्वागताध्यक्ष गाव मध्यवर्ती अध्यक्ष सुनील जाधव व मुंबई मध्यवर्ती अध्यक्ष सिद्धार्थ पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा पुष्पगुच्छ यथोचित सन्मान केला, संस्कार समितीचे मुंबई अध्यक्ष संजय गमरे, सेक्रेटरी मनोज पवार, गाव शाखा अध्यक्ष शशिकांत जाधव, सेक्रेटरी सुभाष जाधव यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी व श्रामनेर संघांनी धार्मिक विधी पार पाडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ कदम अध्यक्षीय भाषणात “हे वर्षावास मालिकेचे हे दुसरे वर्ष असून, ही मालिका राबविण्यामागची कारणे, उद्दिष्टे व पुढील वाटचाल यावर प्रकाश टाकला, अश्विन पौर्णिमा आषाढ पौर्णिमा हा वर्षावास मालिकेचा कालावधी जरी संपला असला तरी गावोगावी जाऊन धार्मिक प्रबोधन करून आदर्श बौद्ध समाज घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू” असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभाग अधिकारी, शाखा अध्यक्ष, चिटणीस, कार्यकारिणी, गाव, मुंबई शाखा विश्वस्त मंडळी या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले. सरतेशेवटी अध्यक्षीय भाषण संपल्यावर चिटणीस महेंद्र मोहिते यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.