शहराच्या विकासात कमी पडलो नाही आणि कमी पडणार सुद्धा नाही : ना. श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण नगरपालिकेचा व माझा संबंध हा १९९१ पासूनचा आहे. आमदार व मंत्री झाल्यानंतर फलटण शहराचा आणि माझा संबंध हा वाढत गेला. शहराने माझ्यावर व कुटुंबियांवर कायमच प्रेम केलेले आहे. फलटण शहरामध्ये आमची सत्ता आल्यापासून फलटण शहराच्या विकासामध्ये कधी कमी पडलो नाही आणि आगामी काळामध्ये सुद्धा कमी पडणार नाही, असे मत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण शहरामध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना ना. श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, सौ. मधुबाला भोसले, सौ. दीपाली निंबाळकर, सौ. वैशाली चोरमले, सौ. वैशाली अहिवळे, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, भाऊसो कापसे, रामराजे युवा मंचचे संस्थापक राहुल निंबाळकर, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, युवा उद्योजक अमोल भोईटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

माझं स्वतःचे राजकारण हे फलटण शहरापासून सुरु झालेले आहे. सातत्याने सलग तीस वर्षे फलटणकर हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आगामी काळामध्ये सुद्धा असेच राहतील, यात कसलीही शंका नाही. १९९१ साली गजानन चौकात जे पहिल्यांदा भाषण केले ते माझं पाहिलंच भाषण होत, बाकी सर्व विसरलो तरी ते भाषण विसरू शकत नाही. फलटण शहराचा गेल्या तीस वर्षांमध्ये कायापालट झालेला आहे, असेही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी नगराध्यक्ष झाल्यावर ज्या त्रुटी राहिल्या होत्या, त्यावेळी मलाच त्या मोठ्या प्रमाणावर जाणवत होत्या. फलटण हे राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले शहर आपण विकासाच्या मार्गावर आणले. स्वच्छ फलटण व सुंदर फलटण करण्यासाठी माझे स्वतःचे प्रयत्न हे कायमच असणार आहेत, असेही ना. श्रीमंत रामराजे म्हणाले.

फलटणमध्ये औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहेत. औद्योगिक कंपन्यांना ज्या सुविधा लागतात, त्या देण्यात ह्या पुढे फलटण नगरपालिका कमी पडणार नाही. फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नागरिकांच्या व नगरसेवकांच्या सहकार्यानेच पुढे जावे लागणार आहे. नगरसेवकांच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असतात. त्या तक्रारीचा जो निपटारा करून कार्यरत राहतो यामध्येच नगरसेवक तयार होत असतात. नगरसेवकांच्या कडून न झालेल्या कामांची सुद्धा जबाबदारी हि माझीच असून आगामी काळामध्ये फलटणचा विकास करण्यासाठी फलटणकरांनी असेच पाठीशी राहणे गरजेचे आहे, असेही ना. श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

फलटण शहरामधील सांस्कृतिक भवनचे पुनर्जीवन करून सुसंस्कृत फलटण करण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील आहोत. २१ व्या शतकातील अद्यावत फलटण शहर करण्यासाठी आगामी आलेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला पूर्ण ताकदीने निवडून देणे गरजेचे आहे, असेही ना. श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!