मनोधैर्य योजनेची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य तसेच पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेंद्र भागवत, महिला व बाल विकासचे आयुक्त श्री. राहुल मोरे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. एम. पी. धोटे, गृह विभागाचे प्रधान सचिव श्री. संजय सक्सेना आदी उपस्थित होते.

राज्यात या योजनेअंतर्गत सहाय्य मिळालेल्या पीडितांची संख्या, आर्थिक सहाय्य प्राप्त होण्याचा कालावधी यासंदर्भातील माहिती सादर करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. महिलांना मदत मिळण्यास विलंब होत असेल, तर याचा सखोल अभ्यास करून त्रुटी दूर कराव्यात. योजनेस गती देण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दर महिन्याला मनोधैर्य योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मनोधैर्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व जास्तीत जास्त पीडितांना कमी कालावधीत अर्थसहाय्य मिळावे यासाठी तत्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे. पीडित महिलांना योजनेचे सहाय्य मिळण्यासाठी कमीत कमी कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. ट्रॉमा केअर पुनर्रचनेची गरज असून राखीव निधीतून या योजनेला निधी मिळावा. साक्षीदार संरक्षण कायद्यासंदर्भात अहवाल सादर करावा. सध्या जिल्हा समित्यांकडे किती अर्ज प्रलंबित आहेत याचीही माहिती तयार करावी. पीडित महिलेचे त्यांना न्याय मिळेपर्यंत समुपदेशन करावे, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!