दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२२ । पंढरपूर । आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारकाचा प्रश्न मार्गी लावुनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी यात्रेच्या पांडुरंगाच्या शासकीय महापुजेला पंढरपुरात यावे, अन्यथा आम्ही सर्व समाजबांधव व कार्यकर्ते चंद्रभागेत जलसमाधी घेऊ असा इशारा महर्षी वााल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय. यासोबतच पंढरपूरच्या सुधारीत विकास आराखड्यालाही आपला विरोध असुन तात्काळ प्रस्तावित विकास आराखडा रद्द करावा तसेच तुमचं शासन आलं आणि आमचे जातीचे दाखले मिळणं बंद झालंय, तरी आदिवासी महादेव कोळी जमातीच्या जातींच्या दाखल्यांचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवावा अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत.
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात ज्या ठिकाणावरुन इंग्रजांनी अटक केली होती. त्या ठिकाणी त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे. अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून येथील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात येत होती. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदने देऊन हे स्मारक होण्यासंबंधीची आवश्यकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. अखेर महर्षी वाल्मिकी संघाच्या या पाठपुराव्या हिरवा कंदील दाखवत श्री.फडणवीस यांनी संबंधित स्मारकास मंजुरी दिली होती, परंतु 2017 मध्ये मंजुरी मिळुनही हे काम प्रलंबीत आहे. त्यामुळे आमच्या समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत, तरी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ता तरी तातडीने याबाबत आदेश देऊन स्मारक उभारणीसाठी ठोस पावले उचलूनच कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापुजेसाठी पंढरीत यावे. अन्यथा नाईलाजाने आम्हाला चंद्रभागेच्या पाण्यात जलसमाधी घ्यावी लागेल. असे मत गणेश अंकुशराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या प्रेसनोटमध्ये व्यक्त केले आहे.
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे हे चंद्रभागेच्या पात्रात वारकर्यांना, पंढरपूरकरांना व कोळी महादेव जमातीच्या बांधवांना इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुध्द लढा देण्यास सज्ज व्हा..! असे सांगून इंग्रजांच्या विरुध्द क्रांतीची मशाल पेटवण्याचे कार्य करत असतानाच 2 जानेवारी 1848 मध्ये इंग्रजांनी त्यांना चंद्रभागेच्या पात्रातून अटक केली. पुढे 2 मे 1848 रोजी ठाणे येथे त्यांना फासावर चढवण्यात आले. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांनी 1826 मध्ये क्रांतीच्या लढ्यात सहभाग घेतला. 1827 मध्ये त्यांनी क्रांतीची प्रतिज्ञा घेतली. इंग्रज सत्तेच्या विरोधातील 1828 च्या उग्र उठावात तसेच 1830, रतनगड उठाव 1838, जुन्नरचा उठाव 1845 आदी लढ्यात त्यांचा अग्रभागी सहभाग होता. त्यांना पकडून देणारास इंग्रजांनी बक्षीसही जाहीर केले होते. त्यांना फाशी दिल्यानंतर क्रांतीचा लढा देशात अधिकच तीव्र झाला. याचे प्रत्यंतर 1857 चा उठाव झाला. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके हे राघोजी भांगरेंना गुरुस्थानी मानत होते.
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासोबतच महादेव कोळी जमातीचे दाखल्यांचाही प्रश्न सुटलेला नाही. दाखले देणे सुरु असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच बंद झाले. त्यामुळे सरकारने आत्ता यापुढे तरी कोळी जमातीच्या संयमाचा अंत बघु नये. व आमचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस पावले उचलावीत एवढीच अपेक्षा असल्याचं मतही गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले.