दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । नागठाणे । गेल्या दीड वर्षांपासून कोरोना साथरोगाने सातारा जिल्ह्याला जेरीस आणले असतानाच नागठाणे (ता. सातारा) व परिसरातील गावांमध्ये डेंग्यूची साथ आल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अन्य साथीचे रोगही उदभवण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
कोरोना साथीने सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल केले आहे.नागठाणे परिसरातील गावांमधूनही मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून अनेकांचा मृत्यूही झाला आहे. या साथीमुळे जनतेत भीतीचे वातावरण असतानाच आता परिसरातील गावांमधून डेंग्यूच्या साथीनेही डोके वर काढले आहे.
नागठाणेसह सातार्यातील खाजगी रुग्णालयातून तसेच सरकारी रुग्णालयातही अनेक डेंग्यूचे रुग्ण आजमितीला उपचार घेत आहेत. त्यातच कोरोनातून बाहेर पडलेल्या रुग्णांना डेंग्यू ची लागण लवकर होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिसरातील अनेक गावांमध्ये डेंग्यूचे रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या कोरोना साथींच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या साथीकडे प्रशासनाचे म्हणावे असे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आधीच कोरोनामुळे हतबल झालेल्या येथील ग्रामस्थांमध्ये या डेंग्यूच्या साथीच्या भरीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हा प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
कोपर्डे येथून युवती बेपत्ता
नागठाणे, कोपर्डे (ता. सातारा) येथून युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. कोमल निवास काजळे(वय 20) असे बेपत्ता युवतीचे नाव आहे. कोमल काजळे ही कुटुंबियांसोबत कोपर्डे येथे रहावयास आहे. शुक्रवारी रात्री उशिरा कोमल काजळे ही घरात कोणास काही न सांगता निघून गेली. याची फिर्याद आई मीनाक्षी काजळे यांनी शनिवारी सायंकाळी दाखल केली असून पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.
अतीत येथून विवाहिता बेपत्ता
नागठाणे:- अतीत (ता. सातारा) येथून विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सौ. प्रियांका राजू चौगुले (वय 23) असे या विवाहितेचे नाव आहे. शनिवारी सकाळी प्रियांका चौगुले या मुलांच्या शाळेत रेशनिंग आले आहे, ते आणायला जाते असे सांगून घरातून निघून गेल्या. बराच उशीर शोधूनही त्या न सापडल्याने सायंकाळी उशिरा सासू लक्ष्मीबाई सुखदेव चौगुले यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.