दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२२ । मुंबई । संतूर वाद्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे अशी पंडित शिवकुमार शर्मा यांची ओळख होती. भारतीय संगीतातील त्यांच्या अनोख्या संतुर वादनाच्या कौशल्यामुळे त्यांचे नाव जगभर झाले होते. संतूर वादकाबरोबरच गायक आणि संगीतकार अशी ओळख निर्माण करणाऱ्या पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
हिंदी सिनेसृष्टीत पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया या दोघांनी एकत्र येऊन शिव-हरी या नावाने अनेक हिंदी सिनेमांना संगीतबध्द केले होते. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह पंडितजींना 1991 मध्ये पद्मश्री तर 2001 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संतूर लोकवाद्याला अभिजात संगीत विश्वात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचेही श्री. देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.