
स्थैर्य, फलटण : राज्यातील सन २००१ नंतरच्या कायम विना अनुदानीत वरिष्ठ महाविद्यालयांना कायम शब्द काढून प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे या मागणीसाठी दि. १९ जून पासून महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानीत वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेच्यावतीने सुरु असलेले घर बैठे आंदोलन रस्त्यावर उतरुन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या मागणीसाठी संघटनेच्यावतीने दि. १९ जून पासून घर बैठे आंदोलन सुरु असून शासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने संघटनेने आंदोलनाची माहिती राज्यातील सर्व शिक्षक आमदार यांच्याकडे देऊन त्यांच्या कडे शासनाप्रती रोष व्यक्त केला.
सर्व शिक्षक आमदार व शिक्षण तज्ञ, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, संघटना पदाधिकारी, सभासद यांना सहभागी करुन घेऊन या प्रश्नांसाठी वेबिनारचे आयोजन करुन सर्वांना शिक्षक व कामगारांच्या अडचणी मांडण्यात आल्या.
शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉ. दीपक धोटे, अमरावती यांनी या चर्चेत सहभागी होत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचा कायम शब्द काढून त्यांना अनुदान देण्याचे सूत्र स्विकारले आहे मग वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान का नाही असा सवाल करीत वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वरिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदानापैकी ५०% केंद्र शासनाने उपलब्ध करुन दिले तर UGC आणि RUSA यासारख्या स्वायत्त संस्था अनुदान देतात, त्याचप्रमाणे राज्यातील उच्च शिक्षणाचे प्रमाण जे आज केवळ १९% आहे, त्यामध्ये वाढ केली तर RUSA च्या योजनांची अंमलबजावणी करता येईल असे सांगून वरिष्ठ महाविद्यालयाबाबत शासनाने केलेला भेदभाव त्यांना अनुदान देऊन संपुष्टात आणावा अशी अपेक्षा वेबिनारच्या माध्यमातून डॉ. दीपक धोटे यांनी सुचविले आहे.
सन २०१२ मध्ये राजेश टोपे शिक्षण मंत्री असताना या विषयावर ना. अजित पवार यांनी बैठक लावल्याची आठवण करुन देत आता हा विषय मंत्री मंडळासमोर मांडण्याची आवश्यकता व्यक्त करीत या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्व मंत्र्यांना निवेदनाद्वारे या प्रश्नांची माहिती देण्याची सूचना आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.
शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडविण्याची ग्वाही देत आ. श्रीकांत देशपांडे व आ. बाळाराम पवार यांनी आंदोलन मागे घेण्याची सूचना केली तथापी गेल्या २० वर्षांपासून आम्हाला वेतन नाही, आमचे जीवन कसे जगायचे हा गंभीर प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला असल्याने शासन ठोस भूमिका घेऊन सकारात्मक निर्णय घेत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहील किंबहुना अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय गंगाधर जाधव, सचिव डॉ. देवमन कामडी, उपाध्यक्ष डॉ. विवेक घोलप वगैरे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव वगैरेंनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे प्रतिनिधित्व सचिन सूर्यवंशी बेडके यांनी केले
वेबिनारमध्ये राज्यातील सर्व शिक्षक आमदार विक्रम काळे औरंगाबाद, डॉ. सुधीर तांबे अहमदनगर, नागो गणारव नागपूर, दत्तात्रय सावंत पुणे, श्रीकांत देशपांडे अमरावती, बाळाराम पवार कोकण, शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉ. दीपक धोटे अमरावती, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी प्राचार्य डॉ. संजय गायकवाड औरंगाबाद, सचिन सूर्यवंशी बेडके सातारा, प्रा. मोहंमद मझोरुद्दीन मोहंमद खलिलोद्दीन नांदेड आदी मान्यवर या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते.