श्रध्देने केलेले कार्य भगवंताला प्राप्त होते : ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी दि. 29 : कायीक, वाचीक व मानसिक तप हे पंढरीच्या पायी वारीत घडते. कोरोनाच्या महामारीत यंदा महाराष्ट्रातील वारकरी या तपाला मुकला आहे. परंतु ज्ञानेश्वरी निरुपणाच्या माध्यमातून श्रवणीय भक्ती होत आहे. माउलींनी १७ व्या अध्यायात सत्व, रज आणि तम गुणाची व्याख्या दिली आहे. सात्विक श्रध्दा मानवी जीवाला ईश्वर प्राप्तीसाठी महत्वाची असून श्रध्देने केलेले कोणतेही कार्य भगवंताला प्राप्त होते असे मत ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील यांनी केले.

आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( सोमवार ) सतराव्या  दिवशी बावी जि सोलापूर  येथील ह भ प ज्ञानेश्वर  महाराज पाटील यांनी श्रध्दादिनिरुपणयोग   या सतराव्या अध्यायावर सुरेख निरुपण केले .

ह.भ.प.पाटील महाराज म्हणाले, श्रीमद्भगतद् गीते मधील अर्थात ज्ञानेश्वरीतील १७ वा अध्याय हा श्रद्धात्रयविभागयोग या नावाने असणारा अध्याय आहे. सोळाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी शास्त्रविधीचा त्याग करून मनाला वाटते त्या पध्दतीने आचरण करणाऱ्या पुरुषांना सिध्दी, सुख,आणि परमगती मिळत नसल्याचे सांगितले.

भगवंताचे हे बोलने ऐकून अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाली की, शास्त्रविधीला सम्यक रितीने जाणणारे लोक तर फार कमी आहेत. या उलटपक्षी अधिकतर प्रमाणात असेच लोक जास्त आहेत की, जे शास्त्रविधीला जाणत नाहीत,

पण आपल्या कुलपरंपरा, वर्ण, आश्रम, संस्कार इत्यादीनुसार देवता इत्यादींचे श्रद्धापुर्वक यजन, पुजन करतात.

 शास्त्रविधीचा त्याग झाल्याने अशा पुरुषांची आसुरी, नीच स्थिती होत असावी, आणि श्रद्धा असल्यामुळे उच्च दैवी स्थिती होत असावी, म्हणजे त्यांची वास्तविक स्थिती कोणती होत असावी अशी अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली. या उद्देशाने अर्जुनाने भगवान श्रीकृष्णा जवळ जी शंका व्यक्त केली त्या शंकेचे अर्थात त्या प्रश्नाचे भगवंतानी जे उत्तर दिले ते उत्तर म्हणजेच हा श्रद्धात्रयविभाग योग नावाचा सतरावा अध्याय आहे.

या श्रद्धात्रयविभाग योग नावाच्या सतराव्या अध्यायात भगवंतानी श्रद्धा, आहार, यज्ञ, तप, दान, नामहात्म्य  या विषयांचे सविस्तर वर्णन केले आहे. प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात श्रद्धा असते,मग उध्दार सर्वांचा का होत नाही तर ती श्रद्धा ही तीन प्रकाराची असते

सात्विक, राजस,तामस, यामधील राजस आणि तामस श्रद्धा ही बंधानाला तर सात्विक श्रद्धा हीच मुक्तीला कारण ठरते. अर्थात सात्विक श्रद्धेनेच मनुष्याचा उध्दार होतो. पण ही सात्विक श्रद्धा निर्माण होण्यासाठी आहार सुद्धा सात्विक पाहिजे. म्हणून या आहाराचे सुध्दा सात्विक, राजस, तामस असे तीन प्रकार आहेत.

याप्रमाणे यज्ञ,तप,दान, याचे सुध्दा सात्विक, राजस,तामस, असे तीन प्रकार आहेत. अशाप्रकारे सात्विक माणसे परमात्म प्राप्तीसाठी जे यज्ञ,तप,दानरुपी कर्म करतात त्या कर्मात होणाऱ्या उणीवेच्या पुर्तीसाठी भगवंतानी ओम, तत्, सत् या एकाच ईश्वराच्या  तीन नामाचा महिमा सांगितला आणि शेवटी भगवान म्हणतात अर्जुना मनुष्याने अश्रध्देने केलेले, हवन, दान, तप, किंवा इतर जे काही केले जाईल त्याचे फल या लोकातही मिळत नाही आणि मृत्यूनंतर परलोकातही मिळत नाही.

या कार्यक्रमाचे निवेदन ह.भ.प.स्वामीराज भिसे यांनी केले.

आज मंगळवार दि. ३० रोजी आळंदी जि.पुणे येथील ह.भ.प.रविदास महाराज शिरसाठ हे सायंकाळी ४ वाजता “पालखी सोहळा पत्रकार संघ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या “सर्वगीतार्थसंग्रहयोग” या अठराव्या अध्यायावर निरुपण करतील.

दरम्यान आज (सोमवार) पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा, अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली. यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले. सकाळी श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाच्या वतीने तर रात्री देहूकर फडाच्यावतीने कीर्तनाची सेवा झाली. दुधीकर यांच्यावतीने जागराची सेवा करण्यात आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!