मार्ली घाटात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पांचगणी, दि. 30 :  जावली तालुक्यातील मार्ली घाटात दि. 11 ऑगस्ट रोजी पोलिसांना अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसतानाच आज (शनिवारी) त्याच जागेपासून काही अंतरावर दुसरा मृतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा सिरियल किलिंगचा प्रकार आहे, की आत्महत्या याबाबत ग्रामस्थांमधून संशय व्यक्त होत आहे. या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांना स्वीकारावे लागणार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्ली घाटात एक मृतदेह सडलेल्या अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत शिंदे, करहर पोलीस ठाण्यातील हवालदार डी. डी. शिंदे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी कवटी धडावेगळी पडली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यातच शीर धडावेगळे असल्यामुळे हा खून आहे की जंगली प्राण्याने शीर धडावेगळे केले हे निश्‍चित सांगता येत नाही. मृतदेहाच्या अंगावर साडी व स्वेटर आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. हा मृतदेह 15 ते 20 दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एका महिन्यात सलग दुसरी घटना,  ठिकाण जवळपास तेच आणि घटना घडलेच्या दिवसांचा ताळमेळ पाहता या दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या परिचयातील असण्याची शक्यता सुद्धा घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांकडून वर्तवली जात होती. त्यामुळे या घटनेचा शोध घेण्याचे मोठे आव्हान मेढा पोलिसांपुढे आहे. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांच्या मार्गदर्शनाखाली करहर पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार डी. डी. शिंदे तपास  करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!